माझ्या तैवान दौऱ्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष असुरक्षित बनले आहेत

-अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांचा टोला

china-anti-air-battery-testवॉशिंग्टन – ‘माझ्या तैवान भेटीनंतर, चीनने तैवानच्या सभोवताली सुरू केलेले युद्धसराव चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग असुरक्षित बनल्याचे दाखवून देत आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची स्थिती ढासळली आहे, असे मला वाटते’, असा टोला अमेरिकन सभापती नॅन्सी पेलोसी यांनी लगावला. तसेच संधी मिळाली तर आपण पुन्हा तैवानला भेट देणार असल्याचे पेलोसी यांनी म्हटले आहे.

अमेरिकन सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यास त्यांचे विमान हल्ले चढवून पाडले जाईल, अशी धमकी चीनच्या राष्ट्रीय माध्यमांनी गेल्या आठवड्यात दिली होती. या धमकीकडे दुर्लक्ष करून पेलोसी यांनी तैवानचा दौरा करून राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. यामुळे संतापलेल्या चीनने तैवानच्या सभोवताली सहा ठिकाणी लाईव्ह फायरिंग ड्रिलचे आयोजन केले होते. या सरावात चीनने तैवानच्या आखातात 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा माराही करून पाहिला.

china-pelosiतर पेलोसी जपानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनने जपानच्या ‘एक्स्लूझिव्ह इकोनॉमिक झोन-ईईझेड’ या सागरी क्षेत्राजवळ क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. त्याचबरोबर तैवान भेटीचा निषेध म्हणून चीनने पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबियांवर निर्बंधांची घोषणा केली. आपला आशिया दौरा संपवून अमेरिकेत परतलेल्या पेलोसी यांनी चीनच्या या कारवाईचा समाचार घेतला. अमेरिकी वृत्तवाहिन्यांशी बोलताना पेलोसी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर थेट हल्ला चढविला.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग माझ्या तैवान भेटीमुळे असुरक्षित बनले आहेत. म्हणूनच चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने गेल्या आठवड्याभरात तैवानला वेढा घालणारा युद्धसराव सुरू केल्याचा टोला पेलोसी यांनी लगावला. ‘चीनचे राष्ट्राध्यक्ष अस्वस्थ होतील, असुरक्षित बनतील म्हणून अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांनी तैवानला भेट देऊ नये, हे काही स्वीकारता येण्याजोगे नाही’, असे सांगून पेलोसी यांनी तैवानबाबत चीनच्या दबावाला आपण किंमत देत नसल्याचे दाखवून दिले.

jinpingगेल्या आठवड्यात केलेल्या तैवानच्या दौऱ्याबाबत मला कुठलीही खंत वाटत नाही. याउलट संधी मिळाली तर मी पुन्हा तैवानला भेट देईन, असा दावा पेलोसी यांनी केला. तैवानला एकटे पाडण्याच्या चीनच्या कारवायांना अमेरिका साथ देणार नाही, असेही पेलोसी यांनी ठासून सांगितले. तर चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा अध्यक्षपद मिळावे, यासाठी धडपडत असलेले राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची स्थिती ढासळल्याचा दावा पेलोसी यांनी केला.

दरम्यान, पेलोसी यांच्या आशिया दौऱ्याचा पुढचा टप्पा म्हणून अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमधील आपली गुंतवणूक अधिकच वाढविणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपमंत्री वेंडी शर्मन यांनी ही घोषणा केली. या क्षेत्रातील सहकारी देशांबरोबरचे सहकार्य विस्तारीत करण्याला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी प्राथमिकता दिली आहे, अशी माहिती शर्मन यांनी दिली. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांच्या शेजारी चीन करीत असलेल्या हालचाली लक्षात घेऊन शर्मन यांनी हा इशारा दिल्याचे दिसते आहे.

leave a reply