अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय संकट उद्भवले आहे

- माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकास्त्र

वॉशिंग्टन – ‘बायडेन प्रशासनाच्या धोरणांमुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवर मोठ्या प्रमाणात बळी जात असून इथे राष्ट्रीय संकट उद्भवले आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवरून अमेरिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी मानवी तस्करीच्या घटनाही वाढल्या आहेत’, या शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष यांच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. ट्रम्प यांच्यासह अमेरिकेतील माजी अधिकार्‍यांनीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना या प्रकरणी धारेवर धरले आहे.

अमेरिकेत येणार्‍या अवैध निर्वासितांच्या लोंढ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात एक लाखांहून अधिक जणांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. जानेवारी महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल २८ टक्के असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. या निर्वासितांसंदर्भात योग्य कायदेशीर प्रक्रिया राबविण्यासाठी तसेच त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी बायडेन प्रशासनाने कोणत्याही ठोस तरतुदी केलेल्या नाहीत. त्यामुळे अमेरिका-मेक्सिको सीमेवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली असून मेक्सिको सीमेवर निर्वासितांच्या त्सुनामी धडका देत आहेत, असा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा बायडेन प्रशासनाला लक्ष्य केले आहे. काही आठवड्यांपूर्वी अमेरिका-मेक्सिको सीमेवरील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात होती, मात्र बायडेन प्रशासनाने त्याचे रुपांतर राष्ट्रीय संकटात करून टाकले आहे, असा ठपका ट्रम्प यांनी ठेवला. यावेळी त्यांनी नव्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांच्या निर्णयांवरही टीका केली असून, ते अकार्यक्षम असल्याचे काही दिवसातच सिद्ध झाले आहे, असा दावा केला.

ट्रम्प यांच्यापाठोपाठ माजी अधिकारी तसेच संसद सदस्यांनीही मेक्सिको सीमेवरील स्थितीवरून बायडेन यांच्यावर कडाडून हल्ला चढविला. ‘सीमेवर निर्माण झालेल्या संकटावरून बायडेन ट्रम्प यांना जबाबदार धरत आहेत. खरेतर ही समस्या त्यांनीच निर्माण केली आहे. आता ते निर्वासितांना दूर ठेवण्यासाठी मेक्सिकोलाही आवाहन करीत आहेत. पण ही कल्पना मुळात डोनाल्ड ट्रम्प यांचीच होती’, याची आठवण संयुक्त राष्ट्रसंघटनेतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी करून दिली.

व्हाईट हाऊसच्या माजी प्रवक्त्या कायले मॅक्एनॅनी यांनीही बायडेन यांच्या धोरणांवर हल्ला चढविताना, ट्रम्प प्रशासनाच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष केल्यानेच मेक्सिको सीमेवर संकटाची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. अमेरिकेतील संसद सदस्य मॅट गेट्झ व डॅन क्रेनशॉ यांनीही, निर्वासितांच्या मुद्यावर बायडेन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांवर सडकून टीका केली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत घुसखोर निर्वासितांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अमेरिकेचा परराष्ट्र विभाग, अंतर्गत सुरक्षा विभाग व न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक आक्रमक निर्णय घेण्यात आले होते. २०१९ साली झालेल्या ‘स्टेट ऑफ युनियन’ भाषणात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देशाच्या दक्षिण सीमेवरून घुसणारे लोंढे हे राष्ट्रीय संकट असल्याचा इशारा दिला होता. मेक्सिको सीमेवर ‘बॉर्डर वॉल’चे काम सुरू करून तसेच अतिरिक्त सुरक्षायंत्रणा तैनात करून निर्वासितांच्या लोंढ्यांना पायबंद घालण्याचे प्रयत्न केले होते.

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांविरोधात राबविलेले धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे असल्याचा दावा करून, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेतील बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे वटहुकूम जारी केले होते. त्याचे विपरित परिणाम समोर येऊ लागल्याने बायडेन प्रशासन आता बचावात्मक पवित्र्यात गेल्याचे दिसत आहे.

leave a reply