रशियाच्या मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करणार्‍या देशांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा

मालमत्तेचे राष्ट्रीयीकरणमॉस्कोे/बर्लिन – ‘दुसर्‍या देशांमध्ये असलेल्या रशियाच्या मालमत्तेचे ते देश राष्ट्रीयीकरण करण्याची भाषा करीत आहेत. पण हे दुधारी शस्त्र आहे, याची जाणीव त्याचा वापर करणार्‍यांनी ठेवावी’, असा सज्जड इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे. जर्मनीने रशियाची आघाडीची इंधनकंपनी ‘गाझप्रोम’चा जर्मनीतील उपक्रम असणार्‍या ‘गाझप्रोम जर्मनिआ’च्या राष्ट्रीयीकरणाची घोषणा केली आहे. युरोपातील इतर देशांनीही रशियन बँका व इतर उपक्रमांबाबत तसे संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

युरोपिय महासंघाने आतापर्यंत चार टप्प्यात रशियावर मोठे निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांअंतर्गत रशियातील ८७०हून अधिक नेते, अधिकारी व उद्योजकांसह ६२ रशियन कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र इंधनक्षेत्रावरील निर्बंधांबाबत अद्यापही एकमत होऊ शकलेले नाही. युरोपिय महासंघातील मालमत्तेचे राष्ट्रीयीकरणकाही देश एका दिवसात रशियाकडून इंधनाची आयात थांबवू शकत नाहीत, अशा शब्दात जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअरबॉक यांनी जर्मनीची भूमिका स्पष्ट केली होती. तर आपली इंधनसुरक्षा धोक्यात टाकणार्‍या कोणत्याही निर्बंधांना मान्यता देणार नसल्याचे हंगेरीकडून बजावण्यात आले आहे. महासंघाचे परराष्ट्रप्रमुख जोसेप बॉरेल यांनीही, हंगेरीचा नकाराधिकार कायम असेपर्यंत युरोप रशियावर इंधनविषयक निर्बंध लादू शकत नाही, अशी कबुली दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर, जर्मनीने रशियन इंधनकंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेणे महत्त्वाची घटना मानली जाते. गाझप्रोम जर्मनिआ या जर्मनीतील उपकंपनीवर रशियाच्याच दुसर्‍या कंपनीने ताबा मालमत्तेचे राष्ट्रीयीकरणमिळविल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्तानंतर जर्मनीच्या वाणिज्य मंत्रालयाने तातडीने हालचाली करून सोमवारी गाझप्रोम जर्मनिआ जर्मन सरकारने ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. जर्मनीच्या इंधनपुरवठ्याची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असून त्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे जर्मनीचे वाणिज्यमंत्री रॉबर्ट हॅबेक यांनी जाहीर केले. जर्मनीतील इंधनविषयक पायाभूत सुविधांबाबतचेे निर्णय रशियन राजवट घेऊ शकत नाही, असेही जर्मन मंत्र्यांनी यावेळी बजावले.

जर्मनीपाठोपाठ ब्रिटननेही गाझप्रोम या रशियन कंपनीची ब्रिटनमधील उपकंपनी ताब्यात घेण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी पाश्‍चात्य देशांना इशारा देऊन प्रत्युत्तरासाठी तयार रहावे, असे बजावले आहे. यावेळी पाश्‍चिमात्यांनी टाकलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय इंधन बाजारपेठेत उलथापालथ होत असून युरोपिय देश आपल्या चुकांचे खापर रशियावर फोडू पहात आहेत, असा आरोपही रशियन राष्ट्राध्यक्षांनी केला.

leave a reply