रशियाबाबतच्या धोरणाचा भारताच्या अमेरिकेबरोबरील संबंधांवर परिणाम होईल

- अमेरिकेच्या अभ्यासगटाचा इशारा

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या मागणीनुसार रशियाच्या विरोधात जाण्याचे नाकारून भारताने युक्रेनच्या युद्धात तटस्थ भूमिका स्वीकारलेली आहे. यामुळे अमेरिका निराश झाल्याचे दावे बायडेन प्रशासन करीत आहे. पण काही झाले तरी भारत रशियाच्या विरोधात जाणार नाही. अमेरिकेच्या भारताबरोबरील संबंधांवर याचा परिणाम होऊ शकतो. तरीही भारत अमेरिकेचा सल्ला मान्य करून आपल्या धोरणात बदल करणार नाही’, असे अमेरिकेच्या ‘अलब्राईट स्टोनब्रिज ग्रूप-एएसजी’ या अभ्यासगटाने म्हटले आहे.

संबंधांवर परिणामअमेरिकेच्या इंडो-पॅसिफिकविषयक धोरणात भारताला फार महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच भारताने रशियाबरोबरील संबंधांकडे दुर्लक्ष करावे अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण भारत याला तयार नाही. युक्रेनच्या युद्धात भारताने रशियाच्या विरोधात जाण्यास नकार दिल्याने अमेरिकेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना धक्का बसला आहे. पण भारत आपले रशियाबाबतचे धोरण बदलण्याची अजिबात शक्यता नाही. नजिकच्या काळात तर हे संभवतच नाही, असा निष्कर्ष ‘एएसजी’ने नोंदविला आहे.

अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या उपमंत्री व्हिक्टोरिया न्यूलंड यांनी यासंदर्भात भारताचा दौरा केला होता. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्र्यांमध्ये लवकरच टू प्लस टू चर्चा पार पडेल. त्याच्या आधी न्यूलंड यांनी भारताला भेट दिली. रशियन इंधन, रशियन बनावटीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याला दुसरा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन न्यूलंड यांनी भारताला केले. पण भारताने हा सल्ला मानण्यास नकार दिला आहे. यामुळे अमेरिकेचा सहकारी देश म्हणून भारताच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे, असा इशारा एएसजीने आपल्या अहवाला दिला.

हा अहवाल प्रसिद्ध होत असतानाच, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनीही रशियन शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची खरेदी भारताच्या हिताची नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोरील सुनावणीत संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी हा दावा केला.

leave a reply