चीनच्या धमकीनंतर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची हवाई तळाला भेट

तैपेई/बीजिंग – अमेरिकेशी मैत्री केली तर तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई ईंग-वेन’ यांना जीवे मारू, अशी धमकी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मुखपत्राने दिली. तर त्याआधी सलग तीन दिवस लढाऊ व बॉम्बर विमाने तसेच युद्धनौकांची घुसखोरी घडवून हा युद्धाभ्यास नाही तर तैवान ताब्यात घेण्याची तयारी असल्याचे चीनच्या मुखपत्राने जाहीर केले. यावर खवळलेल्या तैवानने देखील चीनला त्याच भाषेत उत्तर दिले आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा ‘त्साई’ यांनी मंगळवारी एफ-१६ लढाऊ विमानांनी सज्ज असलेल्या हवाई तळाला भेट देऊन, आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी तैवान सज्ज असल्याचा इशारा दिला. तसेच तैवानच्या लष्कराने देखील चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असून चीनला अजिबात भीत नसल्याचे जाहीर केले.

हवाई तळाला भेट

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी किथ क्राच यांनी तैवानला दिलेल्या भेटीने चीन कमालीचा बेचैन झाला आहे. या बेचैनीच्या नादात चीनने तीन दिवसांमध्ये तैवानच्या हद्दीत ४० विमानांची घुसखोरी घडविली. या व्यतिरिक्त चीनने युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या व हेलिकॉप्टर्ससह तैवानच्या सागरी क्षेत्रानजिक नवा युद्धसराव सुरू केला. याआधीही चीनने तैवानच्या सागरी हद्दीजवळ युद्धसराव केला होता. तसेच वरयाग ही विमानवाहू युद्धनौकाही रवाना केली होती. पण सध्या सुरू असलेला युद्धसराव नसून तैवान काबीज करण्याची तयारी असल्याचे चीनच्या मुखपत्राने जाहीर केले. या चिथावणीखोर लष्करी हालचालींमुळे चीनपासून या क्षेत्राला असलेला धोका वाढत चालल्याचा इशारा तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.हवाई तळाला भेट

मात्र तैवानबाबत तोल सुटत चाललेल्या चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने सोमवारी थेट तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांना धमकावले. अमेरिकेशी मैत्री तसेच त्यांच्या नेत्यांबरोबर डिनर करुन राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी विस्तवाशी खेळ सुरू केल्याचे चिनी मुखपत्राने बजावले. त्साई ह्या बंडखोर असून त्यांच्यामुळे चीनच्या नियमांचे उल्लंघन झाले तर युद्ध भडकेल व या युद्धाबरोबर तैवानी राष्ट्राध्यक्षांनाही गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी चिनी मुखपत्राने दिली होती. चीनच्या मुखपत्राने दिलेल्या या धमकीवर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून चीन आणि तैवान युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचा दावा माध्यमे व विश्लेषक करीत आहेत.

हवाई तळाला भेटतैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई तसेच लष्कराने देखील चीनच्या या धमक्यांना उत्तर दिले आहे. तैवानच्या हद्दीतील चीनच्या युद्धनौका आणि विमानांची घुसखोरी आमच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याची टीका तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केली. यापुढे चीनच्या युद्धनौका आणि विमानांनी घुसखोरीचा प्रयत्न केलाच तर तैवानच्या लष्कराला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असून तैवान आपल्या अधिकारांचा वापर करताना कचरणार नाही, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने बजावले. तर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी पेंघू मॅगाँग हवाई तळाला भेट देऊन सुमारे १०० वैमानिकांची भेट घेतली. यावेळी राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी तैवानच्या हवाईदलाच्या सज्जतेचा आढावा घेतला तसेच चिनी लढाऊ विमानांना पिटाळून लावणार्‍या तैवानी वैमानिकांचे विशेष कौतूक केले. तैवानचा प्रत्येक सैनिक आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यासाठी पूर्ण सज्ज आणि पूर्ण क्षमता बाळगून असल्याचा विश्वास त्साई यांनी व्यक्त केला.

leave a reply