‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गुजरातमध्ये ‘एनडीआरएफ’ची पथके तैनात

Nisarg Cycloneमुंबई – अरबी समुद्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ घोंघावत आहे. येत्या ४८ तासात हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातला धडकणार असून दोन्ही राज्ये हाय अर्लटवर आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यात ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’ची (एनडीआरएफ) २३ पथके तैनात करण्यात आली आहेत. १२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणारे हे पहिले उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत हवामान विभाग, एनडीआरएफ आणि तटरक्षक दलाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमध्ये ११ आणि महाराष्ट्रात १० एनडीआरएफची पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानुसार मुंबईत तीन, पालघरमध्ये दोन आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक एक पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून किनाऱ्यावरच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.

leave a reply