नेपाळही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावरकाठमांडू – पाकिस्तान, श्रीलंकेनंतर भारताचा आणखी एक शेजारी देश नेपाळ भयंकर आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. नेपाळकडील परकीय गंगाजळी सतत कमी होत असून श्रीलंकेसारखी स्थिती ओढावू नये यासाठी नेपाळने चैनीच्या व महाग वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. तसेच नेपाळ सरकारने केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरलाही निलंबित केले आहे.

नेपाळकडील परकीय गंगाजळ घटून ९.५ अब्ज डॉलर्स राहिली आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात हीच परकीय गंगाजळी ११.५ अब्ज डॉलर्स होती. इंधनाच्या दराचा जागतिक बाजारपेठेत भडका उडाला आहे. तसेच रासायनिक खते, खाद्यान्न, साखर, तेलाचे भावही वाढले आहेत. त्यामुळे नेपाळकडील डॉलर्स मोठ्या प्रमाणावर खर्ची पडत आहे. याशिवाय चीनच्या महाग कर्जाच्या जाळ्यात नेपाळही अडकला आहे. सतत घटत असलेल्या परकीय गंगाजळीने नेपाळ सरकारला चिंतेत टाकले आहे. परकीय गंगाजळी आटत चालल्यानंतर नेपाळला काही गोष्टींची आयात बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच नेपाळच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरला पंतप्रधान शेर बाहदुर देउबा यांनी निलंबित केले होते. त्यांच्या जागी केंद्रीय बँकेच्या उपगव्हर्नरला या पदाचा तात्पुरता भार देण्यात आला आहे.

यानंतर हा आयात बंदीचा निर्णय झाला आहे. महाग गाड्या, सोने आणि इतर चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सरकारी वाहनांचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नेपाळला इंधन आयातीवरील खर्च मोठा असून या देशाला अनेक गोष्टीसाठी भारत व चीनवर अवलंबून रहावे लागते. त्यामध्ये कोरोनामुळेही नेपाळच्या अर्थव्यवस्थेला झटके बसले आहेत.

मात्र नेपाळच्या अर्थमंत्र्यांनी आपला देश मोठ्या आर्थिक संकटाकडे जात असल्याचे दावे नाकारले आहेत. नेपाळची अर्थव्यवस्था सकारात्मकरित्या योग्य दिशेने पुढे जात आहे, असे अर्थमंत्री जनार्दन शर्मा यांनी म्हटले आहे.

leave a reply