इराणविरोधात क्षेत्रीय देशांची आघाडी आवश्यक आहे

- इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ

देशांची आघाडीजेरूसलेम – ‘‘इराणबरोबरचा अणुकरार होणार नसेल, तर ‘प्लॅन बी’ कार्यान्वित करावा लागेल. यासाठी या क्षेत्रातील इराणविरोधी देशांची आघाडी उभारून सहकार्य वाढविणे आवश्यक ठरते’’, असा संदेश इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलमध्ये पार पडलेल्या नेगेव्ह परिषदेत परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी देखील युएई, बाहरिन, इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांना इराणविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याला या देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

अमेरिका, युरोप आणि इराण अणुकराराच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. काही मुद्यांवरील मतभेद सोडवल्यास लवकरच हा अणुकरार पार पडेल, असा दावा अमेरिकेतील माध्यमे करीत आहेत. युरोपिय महासंघ देखील या अणुकराराबाबत आशावादी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इराणने अणुकराराबाबत आडमुठी भूमिका स्वीकारल्याची टीका पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. त्यामुळे हा करार फिस्कटणार असल्याचा दावा केला जातो.

देशांची आघाडीया पार्श्‍वभूमीवर, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी ‘प्लॅन बी’चा वापर करण्याचे सुचविले आहे. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट पॉलिसी फोरम’ या अभ्यासगटाच्या वेबिनारला संबोधित करताना संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इराणचा अणुकार्यक्रम रोखणे, इस्रायल व आखाती क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे ठणकावले. यासाठी इस्रायल आणि या क्षेत्रातील देशांच्या गुप्तचर यंत्रणांना परस्परांमधील सहकार्य वाढवावे लागेल, असे गांत्झ यांनी सुचविले आहे. त्याचबरोबर अणुकरारात सहभागी असलेले देश इराणच्या अणुकार्यक्रमाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा टोला इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लगावला.

आठवड्यापूर्वी इस्रायलच्या दक्षिणेकडील नेगेव्ह येथे इस्रायल व अरब देशांची पहिलीच विशेष सुरक्षा बैठक पार पडली होती. युएई, बाहरिन, मोरोक्को आणि इजिप्त या देशांनी नेगेव्ह परिषदेत सहभाग घेऊन इस्रायलबरोबरील संरक्षणविषयक सहकार्यासाठी पुढाकार घेतला होता. या बैठकीत इस्रायल तसेच अरब देशांवर इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमापासून या क्षेत्रातील देशांच्या सुरक्षेला असलेला धोका अधोरेखित करण्यात आला होता.

इस्रायलशी सहकार्य करणार्‍या अरब देशांना गंभीर परिणामांची धमकी देणार्‍या इराणला आत्ता कुठे या परिषदेच्या प्रभावाची कल्पना येऊ लागलेली आहे, असा दावा इराणची वृत्तसंस्था ‘तस्निम न्यूज’ने केला होता. यंदाच्या नेगेव्हच्या बैठकीत युएई, बाहरिन, इजिप्त आणि मोरोक्को असे चार अरब देश सहभागी झाले असले तरी येत्या काळात याचा विस्तार होईल. जॉर्डन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया हे देशही यात सहभागी होतील व अरबांची नाटोसारखी संघटना उभी राहील, असा इशारा इराणी वृत्तसंस्थेने दिला होता.

leave a reply