नेपाळमधील पंतप्रधान ओली यांचे सरकार धोक्यात

नवी दिल्ली/काठमांडू – नेपाळचे चीनधार्जिणे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्याविरोधात स्वपक्षीयांनीच दंड थोपटले आहेत. पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली असून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीचे बहुतांश सदस्य ओली यांच्या विरोधात गेले आहेत. भारत आपल्याला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कट आखत आहे, यासाठी आपले विरोधक भारतीय अधिकऱ्यांबरोबर बैठक करीत आहेत, असे आरोप पंतप्रधान ओली यांनी केले होते. या ओली यांच्या दाव्यांना त्यांच्या पक्षांच्या तीन माजी पंतप्रधानांनी आव्हान दिले आहे. तुमचा राजीनामा भारत नव्हे, आम्ही मागत आहोत. आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या, असे आव्हानच ओली यांना स्वपक्षीय नेत्यांनी दिले आहे. तसेच नेपाळ सरकारने ‘सिटिझनशिप कायद्यात’ केलेल्या सुधारणेविरोधात विरोधी पक्षांकडून निदर्शने सुरु झाली आहेत.

NEPAL-PMभारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवून पंतप्रधान के. पी. शर्मा यांनी भारताबरोबरील सीमावाद उकरून काढला होता. तसेच सीमेवर चौक्यांमध्ये वाढ, हिंदी भाषेवर बंदीचा प्रस्ताव, भारतीयांशी रोटीबेटीचे व्यवहार रोखण्यासाठी ‘सिटिझनशिप कायद्यात’ बदल यासारखे एकामागोमाग भारतविरोधी निर्णय ओली सरकारने घेतले होते. मात्र चीनने नेपाळच्या बळकावलेल्या भूभागाबद्दल ओली यांनी एकही शब्द उच्चरला नव्हता. हे वृत्त बाहेर आल्यावर पंतप्रधान ओली यांना जाब विचारला जात आहे. विरोधी पक्षही या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे व चीनकडून आपला भूभाग परत मिळावा, असे आव्हान विरोधीपक्षांकडून देण्यात आले आहे. त्याचवेळी ओली यांच्याच पक्षात दुफळी माजली आहे. ओली यांच्या कामकाजावर जनता खुश नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.

माजी पंतप्रधान पुष्प कमल दहाल उर्फ प्रचंड यांनी सरकार सर्वच आघाड्यावर सपशेल अपयशी ठरले आहे आणि ओली यांच्याकडून सत्ता वाचविण्यासाठी भारतविरोधी कार्ड खेळले जात असल्याचे आरोप केले आहे. तसेच ओली आपले अपयश लपविण्यासाठी लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप इतर नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच पंतप्रधानांनी भारतासारख्या मित्र देशावर सरकार पडण्याच्या प्रयत्नांचे बेजवाबदार आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना पंतप्रधानपदी राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असे कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत इतर नेत्यांनी ओली यांना धारेवर धरले. या बैठकीत पंतप्रधान ओली एकटे पडल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पंतप्रधान ओली हे सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जातील. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे मोड्युल अवलंबतील असा आरोप दोनच दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान प्रचंड यांनी ओली केला होता. तर बुधवारी पंतप्रधान ओली यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोनवरून चर्चा करण्यासाठी संदेश पाठविल्याची बातम्या आहेत. याआधी चीनच्या सरकारी मुखपत्राने लडाख वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला पाकिस्तान आणि नेपाळ सीमेवरुनही आव्हान मिळेल, अशी धमकी दिली होती. नेपाळचे सरकार चीनच्या पाठबळावर हा भारत विरोध करीत असल्याचे भारतीय विश्लेषक आधीपासून सांगत आहेत.

leave a reply