युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना भेटले

रोम/बर्लिन – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू आदरणीय पोप फ्रान्सिस यांची व्हॅटिकन सिटीत भेट घेतली. जवळपास 40 मिनिटे चाललेल्या बैठकीत युक्रेनमधील मानवतावादी व राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती ‘व्हॅटिकन सिटी’च्या सूत्रांकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी रशिया-युक्रेन युद्धात शांतीपूर्ण तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांची भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना भेटलेयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शुक्रवारपासून युरोपच्या दौऱ्यावर असून इटली व जर्मनी या आघाडीच्या देशांना भेट देणार आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिआ मेलोनी यांची भेट घेऊन युक्रेनला देण्यात येणाऱ्या सहाय्याबाबत चर्चा केली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास झेलेन्स्की यांनी व्हॅटिकन सिटीला भेट दिली. यावेळी झेलेन्स्की यांनी ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्याबरोबरील भेट हा मोठा सन्मान असल्याचे वक्तव्य करून कृतज्ञता व्यक्त केली.

पोप फ्रान्सिस व युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. यात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना युक्रेनमधील संघर्ष व सध्याच्या स्थितीची माहिती दिली. पोप फ्रान्सिस यांनी संघर्षात बळी जाणाऱ्या नागरिकांबद्दल संवेदना व्यक्त करून युद्धात सापडलेल्या सर्वांना योग्य सहाय्य मिळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपण प्रार्थना करु, अशा शब्दात ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आश्वस्त केले.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी सातत्याने याबाबतचे आपले परखड विचार मांडले आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर तीव्र दुःख व्यक्त करतानाच त्यात निरपराध्यांचाच बळी जातो, असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले होते. युक्रेन युद्धानंतर मानवता तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे सांगून सदर संघर्ष अमेरिका व नाटोच्या आक्रमकतेमुळे पेटल्याचा दावा पोप फ्रान्सिस यांनी केला होता. त्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांच्या या विधानांवर युक्रेनने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर युक्रेनचे सरकार व ख्रिस्तधर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे दिसत होते.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोप फ्रान्सिस यांनी रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थीसाठी आपण तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच आपण रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित विविध बाजूंशी बोलणी करीत असल्याची माहिती पोप फ्रान्सिस यांच्याकडून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील पोप फ्रान्सिस यांची भेट महत्त्वाची ठरते आहे.

हिंदी

 

leave a reply