इस्रायलचा सिरियाच्या अलेप्पो विमानतळावर नवा हवाई हल्ला

- हल्ल्यात इराणचा छुपा तळ नष्ट झाल्याचा स्थानिक सूत्रांचा दावा

दमास्कस – सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी जोरदार हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन लष्कराने केला. गेल्या दोन आठवड्यात इस्रायलने या विमानतळावर केलेला हा दुसरा हल्ला ठरतो. या हल्ल्यात थोडीफार हानी झाल्याचे सिरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. पण सिरियन माध्यमे खरी माहिती देत नसून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणच्या छुप्या लष्करी तळाला लक्ष्य केल्याचा दावा काहीजणांनी केलेला आहे.

इस्रायलचा सिरियाच्या अलेप्पो विमानतळावर नवा हवाई हल्ला - हल्ल्यात इराणचा छुपा तळ नष्ट झाल्याचा स्थानिक सूत्रांचा दावासिरियातील गृहयुद्धाचा लाभ घेऊन इराण या देशात हिजबुल्लाह तसेच आपल्याशी संलग्न असलेल्या इतर दहशतवादी गटांचा तळ विकसित करीत आहे. इराण या दहशतवादी संघटनांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करीत आहे. सिरियात दाखल होणाऱ्या प्रवासी विमानांच्या आडून इराण या दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करीत आहे. इराणने ही शस्त्रास्त्रे सिरियातील लष्करी तसेच नागरी ठिकाणांवर साठविल्याचा आरोप इस्रायलने केला होता. तसेच इस्रायलवर हल्ला चढविण्यासाठी या दहशतवादी गटांचा वापर करण्याची इराणची योजना असल्याचा ठपका इस्रायलने ठेवला होता. काहीही झाले तरी सिरियाला इराणचा लष्करी तळ बनू देणार नाही, असे सांगून इस्रायलने सिरियात घणाघाती हल्ले सुरू केले होते. सिरियावर हल्ले चढविताना कुणाच्याही परवानगीची प्रतीक्षा करणार नसल्याचे इस्रायलने ठणकावले होते. यानंतरच्या काळात सिरियावर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले झाले व सिरियन लष्कराने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. इस्रायलने या हल्ल्यांचे तपशील कधीही उघड केले नव्हते. मात्र इस्रायलनेच सिरियातील हिजबुल्लाह व इतर दहशतवाद्यांच्या तळांवर शेकडो हल्ले चढविलेले आहेत, असा दावा इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी काही काळापूर्वी केला होता.

बुधवारी पहाटे स्थानिक वेळेनुसार, 3 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत जोरदार हल्ले झाले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी भूमध्य समुद्राचा प्रवास करून हे क्षेपणास्त्र हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन लष्कर करीत आहे. या हल्ल्यानंतर विमानतळाच्या हद्दीतून कानठळ्या बसणारे स्फोटांचे आवाज ऐकू आले, असे स्थानिकांनी म्हटले आहे. तसेच या स्फोटात मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळल्याचे व्हिडिओज्‌‍ व फोटोग्राफ्स स्थानिकांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले.

इस्रायलचा सिरियाच्या अलेप्पो विमानतळावर नवा हवाई हल्ला - हल्ल्यात इराणचा छुपा तळ नष्ट झाल्याचा स्थानिक सूत्रांचा दावापण सिरियन लष्कर व सरकारी वृत्तवाहिनीने या स्फोटात विशेष हानी झालेली नसल्याचे म्हटले आहे. मात्र स्थानिक सूत्रांनी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अलेप्पो विमानतळाजवळ असलेल्या नईराब लष्करी विमानतळावर हे हल्ले झाले. नईराब येथील भूमिगत कोठारात इराणने क्षेपणास्त्रांचा साठा जमा केला आहे. अलेप्पो विमानतळावर मालवाहू विमानातून उतरविलेला हा शस्त्रसाठा याच कोठारात साठवून ठेवल्याची माहिती या सूत्रांनी दिली. त्यामुळे बुधवारच्या हल्ल्यात इराणचे जबर नुकसान झाल्याचा दावा ही सूत्रे करीत आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी देखील अलेप्पो विमानतळावरच हवाई हल्ले झाले होते. त्यावेळेसही सिरियन सरकारने या हल्ल्यात विमानतळाचे नुकसान झाले नसल्याचे म्हटले होते. पण सिरियाने हल्ल्यानंतर काही दिवसांसाठी अलेप्पो विमानतळाची सेवा पूर्णपणे बंद केली होती. त्यामुळे या हल्ल्यात इराणचे जबर नुकसान झाल्याचा संशय इथल्या मानवाधिकार संघटनांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, इराण अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत इस्रायलनेही स्वसंरक्षणासाठी इराणच्या लष्करी व आण्विक तळांवर हल्ल्यांचे इशारे दिले आहेत. तर इस्रायलवर चारही बाजूंनी हल्ले चढविण्यासाठी इराण सिरिया, लेबेनॉन तसेच गाझापट्टीतील दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करीत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, इस्रायल सिरियातील इराणच्या ठिकाणांना लक्ष्य करीत असल्याचे दिसत आहे.

हिंदी

 

leave a reply