रशियाला प्रत्युत्तर देणे भाग पडेल

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा ब्रिटनला इशारा

मॉस्को/लंडन – ‘ब्रिटन युक्रेनला रणगाडे पुरविणार आहे. रणगाड्यांबरोबरच युरेनियमचा वापर असलेले तोफगोळेही देण्यात येणार आहेत. असे झाले तर रशियाला प्रत्युत्तर देणे भाग पडेल’, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. पाश्चिमात्य देशांनी आण्विक घटकाचा वापर सुरू करणे ही बाब धक्कादायक असल्याचेही रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले.

रशियाला प्रत्युत्तर देणे भाग पडेल - राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा ब्रिटनला इशारायुक्रेनला शस्त्रपुरवठा करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने युक्रेनला प्रगत ‘चॅलेंजर’ रणगाडे पुरविण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात अधिक माहिती देताना ब्रिटनच्या संरक्षण राज्यमंत्री ॲनाबेल गोल्डी यांनी, रणगाड्यांबरोबरच ‘डिप्लेटेड युरेनियम’चा वापर असणारे तोफगोळेही पुरविण्यात येतील, असे जाहीर केले. ब्रिटनच्या या घोषणेमुळे युरोपसह आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रशियाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. रशियन संसदेचे सभापती वोलोदिन यांनी ब्रिटनची योजना युक्रेनच नाही तर संपूर्ण युरोपसाठी धोकादायक ठरेल, असे बजावले. शेवटच्या युक्रेनियन नागरिकापर्यंत लढण्यात येणाऱ्या युद्धाचे रुपांतर शेवटच्या युरोपियन नागरिकापर्यंतच्या युद्धात होईल, असा गंभीर इशारा रशियन संसदेच्या सभापतींनी दिला. तर रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी ब्र्रिटनची घोषणा म्हणजे नवी चिथावणी असल्याचा आरोप केला.

ब्रिटनने रशियाचे इशारे व आरोप फेटाळले असून यापूर्वीही डिप्लेटेड युरेनियमचा वापर असलेल्या तोफगोळ्यांचा वापर करण्यात आला होता, असा खुलासा केला आहे. डिप्लेटेड युरेनियम वापरलेले तोफगोळे अधिक घातक व प्रभावी ठरतात, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

हिंदी

 

leave a reply