इराणच्या धोक्याविरोधात अमेरिका-इस्रायल एकत्र

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची घोषणा

अमेरिका-इस्रायलजेरूसलेम – ‘या क्षेत्रातील शांतता व स्थैर्याला धोका निर्माण करणाऱ्या इराण आणि इतरांविरोधात अमेरिका व इस्रायल एकत्र आहेत. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे आणि इराणच्या आक्रमक हालचाली उधळून लावण्याबाबत अमेरिका व इस्रायलचे एकमत आहे. अशा निर्णायक वेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री इस्रायलच्या दौऱ्यावर आले असून यामुळे इराणला स्पष्ट संदेश मिळाला असेल’, अशी घोषणा इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलंट यांनी केली.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन इस्रायलमध्ये दाखल झाले असून त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेतली. इराणचा अणुकार्यक्रम व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या आखातातील हालचाली तसेच पॅलेस्टाईनच्या मुद्यावर ब्लिंकन यांनी पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्याशी चर्चा केली. तर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री कोहेन आणि संरक्षणमंत्री गॅलंट यांची भेट घेऊन वेस्ट बँकमधील हिंसाचार आणि इस्रायलच्या न्यायलयीन अधिकारांबाबत उठलेल्या वादावर ब्लिंकन यांनी बायडेन प्रशासनाची भूमिका मांडली. मात्र इस्रायलवर झालेले हल्ले आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेबाबत वचनबद्ध आहे, असे ब्लिंकन म्हणाले.

दरम्यान, परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी पॅलेस्टाईनमधील वेस्ट बँकचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची भेट घेतली. यावेळी इस्रायल-पॅलेस्टाईनमधील शांतीचर्चा तसेच द्विराष्ट्रवादाच्या मुद्यावर बायडेन प्रशासन ठाम असल्याचे ब्लिंकन म्हणाले.

English हिंदी

leave a reply