पाकिस्तानचा नवा राजकीय नकाशा या देशाचा पर्दाफाश करणारा

- पीओकेच्या कार्यकर्त्याची घणाघाती टीका

संयुक्त राष्ट्रसंघ – ”नुकताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, कथित आझाद काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश असणारा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला आहे. यातून या सर्व भागावर पाकिस्तान ने दावा सांगितला आहे. पाकिस्तानचे हे पाऊलच त्यांना काश्मिरींबाबत अजिबात प्रेम वाटत नसल्याचे दाखून देते. पाकिस्तानला त्यांच्या नसलेल्या या भागावर वर्चस्व हवे आहे, असे घणाघाती आरोप ‘युनायटेड काश्मीर पिपल्स नॅशनल पार्टी’ चे प्रवक्ते नसिर अझिझ खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेच्या (युएनएचआरसी) ४५ व्या सत्रात केले.

राजकीय नकाशा

पाकिस्तान आणि चीनमध्ये पीओकेच्या झेलम नदीवर दोन जलविद्युत प्रकल्प उभारण्यावर करार पार पडला. निलम-झेलम जलविद्युत प्रकल्प आधीच उभारुन झाला आहे. कथित आझाद काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमधील नागरिक येथील नद्या आणि जलसंपत्तीचे मालक आहेत. मात्र पाकिस्तान चीनबरोबर करार करून स्थानिकांना विचारात न घेताच येथे मोठी धरणे बांधत आहे. याद्वारे या कथित आझाद काश्मीरमधील साधन संपत्ती ओरबाडली जात आहे’, असे नासिर म्हणाले.

‘१९७४ सालच्या कायदानुसार पाकिस्तान पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानमधल्या जनतेवर हक्क गाजवित आहे. हे नियम पायदळी तुडविल्यावर इथल्या जनतेचा छळ होत आहे. त्यांना ठार मारले जात आहे. या गंभीर समस्येकडे खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे लक्ष वेधले. पाकिस्तानच्या अत्याचाराचा विरोध करणाऱ्यांच्या होणाऱ्या हत्या आणि अपहरणांची संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घ्यावी’, असे आवाहन नासिर यांनी ‘युएनएचआरसी’मध्ये केले.

पाकिस्ताच्या घटनेच्या कलम २५७ नुसार जम्मू आणि काश्मीर हा वादग्रस्त भूभाग आहे. पण पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर जम्मू आणि काश्मीरच्या जनतेवर हक्क गाजवित असतो. मोठमोठे दावे करीत असतो. नुकताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, कथित आझाद काश्मीर (पीओके) आणि गिलगिट बाल्टिस्तान आमचे असल्याचा दावा ठोकून नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. हा नकाशा प्रसिद्ध करून पाकिस्तानने आपल्याला काश्मिरींची काही घेणे नसल्याचे दाखवून दिले आहे, अशा शब्दात खान यांनी ‘युएनएचआरसी’मध्ये पाकिस्तानवर शेरा मारला.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आणखी एक पीओके कार्यकर्ते सज्जाद राजा यांनी पाकिस्तानच्या इम्रान खान यांचे सरकार पीओकेच्या जनतेला प्राण्यांसारखे वागवित असल्याचा आरोप केला होता. ”पाकिस्तानने’ पीओके इलेक्शन अॅक्ट २०२०’ लागू करुन आमचे राजनैतिक आणि नागरी अधिकार आमच्यापासून हिरावून घेतले आहे. आमच्याच घरात आम्हाला देशद्रोही म्हणून हिणवले जात आहे. पाकिस्तानी लष्कर विरोध करणाऱ्यांची हत्या करीत आहे. त्यांचे अपहरण घडवित आहे”, असे सांगून सज्जाद राजा यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. निदान आता तरी संयुक्त राष्ट्रसंघाने याकडे लक्ष द्यावे, असे कळकळीचे आवाहन राजा यांनी केले होते.

leave a reply