चेन्नई, रांची, इंफाळ आणि बंगळुरूमध्ये ‘एनआयए’ची कार्यालये सुरू होणार

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तीन कार्यालये चेन्नई, रांची आणि इंफाळ या शहरांमध्ये सुरू करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याशिवाय वाढत्या दहशतवादी हालचाली पाहता बंगळुरूतही ‘एनआयए’चे कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे मणिपूर, तामिळनाडू, झारखंड आणि कर्नाटकातील दहशतवादी कारवायांच्या तपासात ‘एनआयए’ला मदत मिळेल. सध्या एनआयएचे नवी दिल्लीतील मुख्यालयासह गुवाहाटी, मुंबई, जम्मू, कोलकाता, हैद्राबाद, कोची, लखनऊ, रायपूर आणि चंदीगड या शहरांमध्ये शाखा आहेत.

'एनआयए'ची कार्यालये

सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंफाळ, चेन्नई आणि रांची येथे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अतिरिक्त तीन शाखा स्थापण्यास मंजुरी दिली. एनआयएच्या अतिरिक्त शाखा स्थापन केल्यामुळे दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी एनआयए अधिक कार्यक्षम आणि मजबूत होईल.

२००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारला दहशतवादाचा तपास करण्यासाठी एका विशेष केंद्रीय एजन्सीची गरज भासली. म्हणूनच ‘राष्ट्रीय तपास संस्थेची’ची (एनआयए) स्थापना करण्यात आली. दहशतवादविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम ‘एनआयए’ करते. कुठल्याही दहशतवाद संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एनआयएला कुठल्याही राज्यांची विशेष परवानगी घ्यावी लागत नाही. ३१ डिसेंबर २००८ रोजी भारतीय संसदेने मंजूर केलेले राष्ट्रीय तपास संस्था बिल २००८ लागू केल्यामुळे ही एजन्सी अस्तित्वात आली.

त्यानंतर टप्याटप्याने एनआयएच्या शाखेचा विस्तार करण्यात आला. सध्या एनआयएच्या देशभरात नऊ शाखा कार्यरत आहेत. शिवाय नवी दिल्ली येथील मुख्यालयात विशेष गट उभारण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ल्यांच्या घटना, दहशतवाद आणि दहशतवादाशी संबंधित इतर गुन्ह्यांना अर्थसहाय्य करण्याच्या चौकशीसाठी एनआयएची स्थापना केली गेली आहे.

leave a reply