चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेचा नवा आराखडा

नवा आराखडावॉशिंग्टन – चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला त्यांच्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवी जागतिक व्यवस्था तयार करायची आहे, असा आरोप करून अमेरिकेने कम्युनिस्ट पार्टीच्या कारवाया रोखण्यासाठी नवा आराखडा सादर केला आहे. यासंदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सादर केलेल्या अहवालात, चीनच्या कारवायांना आळा घालण्यासाठी दीर्घकालिन प्रयत्न आवश्‍यक असल्याचे बजावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, चीनविरोधातील आक्रमक मोहीम अद्याप संपली नसल्याचा इशारा दिला होता. परराष्ट्र विभागाचा अहवाल त्याला दुजोरा देणारा ठरतो.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द एलिमेंट्स ऑफ द चायना चॅलेंज’नावाचा 74 पानांचा अहवाल सादर केला. त्यात चीनच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी 10 गोष्टी निर्णायक ठरतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यात जगातील सर्वात सामर्थ्यशाली लष्कर सज्ज ठेवणे, दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्त्वात आलेली खुली व नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था कायम ठेवणे व आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली मित्रदेशांच्या आघाडीची पुनर्रचना यांचा समावेश आहे. त्याचवेळी अमेरिकी जनतेला चीनच्या धोक्याची जाणीव करून देणे आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा पुरस्कार करून त्याला प्राधान्य देण्यासाठी झटणे यांनाही प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

नवा आराखडा

अहवालाच्या सुरुवातीलाच अमेरिकेसह जगातील विविध देशांना चीनच्या वाढत्या धोक्याची जाणीव होण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांमुळे जगात तीव्र सत्तास्पर्धा भडकल्याचा ठपका ठेऊन त्यांना रोखण्याची आवश्‍यकता असल्याचे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला फक्त चीन केंद्रस्थानी असणारी जागतिक व्यवस्था निर्माण करायची असून त्यातून एकाधिकारशाही राबविणे व वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे हीच उद्दिष्टे असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून सुरू असलेल्या कारवाया व त्यांच्या महत्त्वाकांक्षांमागे ‘मार्क्सवादी-लेनिनवादी’ विचाराधारा आणि चिनी राष्ट्रवादाची टोकाची कल्पना या गोष्टी कारणीभूत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हे सर्व रोखायचे असेल तर अमेरिकेला आपले मूळ असलेल्या गोष्टीकडे परतून पुन्हा स्वातंत्र्य मिळवायला हवे, अशी शिफारस परराष्ट्र विभागाने केली आहे. अमेरिकेने आपल्या शिक्षणव्यवस्थेत सुधारणा घडवायला हव्यात तसेच अमेरिकी प्रशासन व इतर विभागातील तज्ज्ञांनी चिनी भाषा, इतिहास, संस्कृती यांची योग्य माहिती करून घ्यायला हवी, असेही परराष्ट्र विभागाने बजावले.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला होता. हाँगकाँग, उघुरवंशिय, तिबेट, व्यापारी लूट यासारख्या अनेक मुद्यांवर चीनविरोधात आक्रमक निर्णय घेण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम पुढील सरकारलाही चालू ठेवणे भाग पडेल, असे संकेत अमेरिकी अधिकारी तसेच विश्‍लेषकांनी दिले होते.

leave a reply