सायबर हल्ले व निवडणुकीत हस्तक्षेपाचा आरोप करून रशियावर अमेरिकेचे नवे निर्बंध

वॉशिंग्टन – सुमारे ३० रशियन अधिकारी व संस्था यांच्यावर कडक निर्बंध लादून सुमारे १० रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्याच्या अध्यदेशावर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्वाक्षरी केली. सोलरविंड सायबर हल्ला आणि अमेरिकेच्या निवडणुकीतील हस्तक्षेप केल्याने रशियावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका रशियाच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. ही कारवाई करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थैर्य माजविणार्‍या रशियाला योग्य तो संदेश दिल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला. या कारवाईमुळे अमेरिका आणि रशियामधील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला असून यावर रशियाकडून जहाल प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

अमेरिकेवर झालेल्या ‘सोलरविंड’ सायबर हल्ल्यामागे रशिया असल्याचा आरोप बायडेन प्रशासनाने केला होता. अमेरिकेच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या सुमारे नऊ एजन्सीज्चा डाटा रशियन सायबर हल्लेखोरांनी मिळविला होता, असे अमेरिकन अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यानंतर अमेरिकेने रशियाला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. इतकेच नाही तर रशियाने काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला, असा आरोप बायडेन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी रशियाने हा हस्तक्षेप केल्याचे बायडेन प्रशासनाचे म्हणणे आहे. रशियाने आपल्यावरील हे दोन्ही आरोप नाकारले असून या आरोपांना पुराव्यांचा आधार नसल्याचे म्हटले होते.

याच्या बरोबरीने बायडेन प्रशासनाकडून रशियावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अफगाणिस्तानात तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांचे मुडदे पाडण्यासाठी रशियाने तालिबानला इनाम देण्याची तयारी केली होती, असा आरोप लगावण्यात आला होता. मात्र हा अत्यंत संवेदनशील व सुरक्षेशी निगडीत असलेला मुद्दा असून याबाबत अधिक काही सांगता येणार नाही, असे अमेरिकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. रशियाने हा आरोपही बिनबुडाचा असल्याचे सांगून अमेरिकेला फटकारले होते. यानंतर अमेरिकेने रशियावर केलेली ही कारवाई उभय देशांमधला तणाव अधिकच वाढविणारी ठरत आहे. यानुसार अमेरिकेने सुमारे ३० रशियन व्यक्ती व संस्थांवर निर्बंध लादले आहेत. याबरोबरच अमेरिकेत कार्यरत असलेल्या दहा रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.

याच्या बरोबरीने अमेरिकन कंपन्यांना रशियन कर्जरोख्यांची खरेदी करण्यावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियाच्या विरोधात ही कारवाई केल्यानंतर, दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पूर्णपणे विफल ठरतील, अशी चिंता आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. विशेषतः युक्रेनच्या सीमेवर रशियन लष्कराने सुरू केलेल्या हालचाली लक्षात घेता, अमेरिका व रशियामध्ये वाटाघाटी सुरू असणे अत्यावश्यक बनले होते. पण ही प्रक्रिया आता धोक्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच आपण रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. पण आता ही चर्चा शक्य नसल्याचे रशियाने जाहीर केले आहे. लवकरच अमेरिकेला रशियाकडून प्रत्युत्तर मिळेल, असे संकेत दिले जात आहेत.

leave a reply