देशातील कोरोनाच्या बळींची संख्या एक लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाव्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या एक लाखाच्या पुढे पोहोचली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या ६४ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाव्हायरसमुळे जगभरात झालेल्या मृत्यू पैकी दहा टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. जगात आतापर्यंत १० लाख ३० हजार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यातील सार्वधिक बळी हे अमेरिकेत गेले असून त्यानंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो. या साथीने एका लाखापेक्षा जास्त बळी गेलेला भारत तिसरा देश आहे.

बळींची संख्या

जगभरात सध्या दरदिवशी चार ते सहा हजार जण कोरोनाने दगावत असताना भारतात दर दिवशी सुमारे एक हजार जणांचा बळी जात आहे. यानुसार सध्या जगाच्या तुलनेत १५ ते २५ टक्के मृत्यू भारतात होत आहेत. मात्र देशात आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत भारतातील मृत्युदर खूप कमी असल्याचा दावा करण्यात येतो.

देशात सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात ४२४ जणांचा या साथीने बळी गेला. तर १५,५९१ नवे रूग्ण आढळले. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७,४९० जण या साथीने दगावले आहेत. एकट्या मुंबईत ९०११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर या साथीचे सर्वाधिक बळी तमिळनाडूत गेले आहेत. तामिळनाडूत आतापर्यंत ९,६५३ जण दगावले आहेत. शुक्रवारी या राज्यात ६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आणि ५,५०० नवे रूग्ण आढळले.

कर्नाटकात गेल्या २४ तासात १२५ जण या साथीने दगावले आणि ८,७९३ नव्या रूग्णांची नोंद झाली. कर्नाटकात आतापर्यंत ९,११९ जणांना या साथीत आपले प्राण गमवावे लागले आहेत. यानंतर आंध्र प्रदेशात या साथीमुळे ५,९०० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ५,४३८ जण या साथीने दगावले आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ५,०७० वर पोहोचली आहे.

दरम्यान ‘आयसीएमआर’ने आतापर्यंत ७ कोटी ३७ लाख कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. गुरुवारी ११ लाख चाचण्या देशभरात घेण्यात आल्या होत्या. देशात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर ७ टक्के आहे. तर देशात या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ८३.७० वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाचे ५३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

leave a reply