आठ लाख रुपयांचे इनाम शीरावर असणाऱ्या माओवाद्याचे आत्मसमर्पण

रायपूर – मंगळवारी छत्तीसगड मध्ये आठ लाख रुपयांचे इनाम शीरावर असणाऱ्या ‘कोसा मारकम’ याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुरक्षादलांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांमध्ये मारकमचा सहभाग होता. त्याचवेळी छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षादल आणि माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला आहे.

आत्मसमर्पण

२२ वर्षांचा कोसा मारकम २०१४ साली माओवाद्यांच्या ‘बाल संगम’ या गटात सामिल झाला. त्यानंतर त्याची बस्तरमधल्या माओवादी गटात नियुक्ती झाली. माओवाद्यांच्या मिलिट्री कंपनीचा तो पाचव्या क्रमांकाचा सक्रीय सदस्य होता. २०१८ साली छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये माओवादी आणि सुरक्षादलांमध्ये झालेल्या चकमकीत चार पोलीस शहीद झाले होते. तर गेल्या वर्षात छत्तीसगडच्या कांकेरमध्ये माओवाद्यांनी ‘सीमा सुरक्षा दला’वर(बीएसएफ) हल्ला चढविला होता. यात ‘बीएसएफ’चे चार जवान शहीद झाले होते. या दोन्ही हल्ल्यांमध्ये मारकमचा समावेश होता. त्यानंतर सुरक्षा दलाने त्याच्या शीरावर आठ लाख रुपयांचे इनाम ठेवले होते.

मारकम छत्तीसगडमधल्या त्याच्या घरी कुटुंबाला भेटायला आला होता. त्यावेळी त्याला ‘लोन वरतु’ उपक्रमाबद्दल कळले. जून महिन्यात सुरक्षा दलाने छत्तीसगडच्या दांतेवाडामध्ये ‘लोन वरतु’ म्हणजेच ‘गावाकडे / घराकडे परत या’ नावाचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाअंतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना मुख्य धारेत आणले जाते. आतापर्यंत १०९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मारकमला माओवाद्यांची विचारधारा पटत नव्हती. त्यामुळे मारकमने शरण जाण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी त्याने दांतेवाडा पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव याच्यासमोर आत्मसमर्पण केले. तातडीने पोलिसांनी मारकमला दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले आणि त्याला पुनवर्सनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

मारकमच्या चौकशीत छत्तीसगडच्या पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली. पण घनदाट जंगलाचा फायदा घेऊन माओवाद्यांनी तिथून पोबारा काढला. मात्र सुरक्षा दलाने राबविलेल्या शोध मोहीमेदरम्यान आयईडी स्फोटके, डिटोनेटर्स, वॉकीटॉकी सेट आणि इतर साहित्य जप्त केले.

दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाने मंगळवारी माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन राबविले. या दरम्यान सुरक्षादल आणि माओवाद्यांच्या चकमकीत एक माओवादी ठार झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षादलाने बिजापूरमधली माओवाद्यांच्याविरोधातली कारवाई तीव्र केली असून चार माओवाद्यांना ठार केले आहे.

leave a reply