अनिवासी भारतीयांनी देशाच्या विकासाचे भागीदार बनावे

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

वॉशिंग्टन – ‘भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना, यापासून स्वातंत्र्याच्या 100 वर्षापर्यंतचा काळ हा अमृतकाळ ठरणार आहे. या काळात देशाच्या विकासात परदेशस्थ भारतीयांनीही योगदान देऊन त्याचे भागीदार बनावे’, असा संदेश केेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला.

विकासाचे भागीदारआंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेच्या बैठकींसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री सीतारामन यांनी सॅन फ्रॅन्सिस्को मधील सिलिकॉन व्हॅली येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी बोलताना सीतारामन यांनी आत्तापर्यंत अमेरिकेतील भारतीय समुदायाने देशाच्ा प्रगतीसाठी फार मोठे योगदान दिले, असे सांगून यासाठी अमेरिकेतील भारतीयांची प्रशंसा केली. विशेषतः तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात अमेरिकेतील भारतीयांनी भरीव कार्य केल्याचे सीतारामन म्हणाल्या.

भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. इथून 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा होईपर्यंतचा काळ, हा देशासाठी अमृतकाळ ठरतो. या काळात देशाची प्रगती व्हावी, यासाठी सरकारने रचनात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. भारताच्या या विकासाच्या प्रक्रियेत अनिवासी भारतीयांनीही सहभागी होऊन त्याचे भागीदार बनले पाहिजे, अशी अपेक्षा सीतारामन यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी देशाबाहेर काम करणाऱ्या भारतीयांनी फार मोठी कामगिरी केल्याचे गेल्या काही वर्षात स्पष्ट झाले होते. 2021 साली जगभरात विखुरलेल्या भारतीयांनी देशात पाठविलेल्या निधीचे प्रमाण 87 अब्ज डॉलर्स इतके आहे. यामध्ये अमेरिकेतील भारतीयांनी पाठविलेल्या निधीचा हिस्सा 20 टक्के इतका आहे. तसेच 2022 सालादरम्यान यात 3.8 टक्क्यांची वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच इतर देशांमधील तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात भारतीयांनी केलेल्या कामगिरीचा थेट तसेच अप्रत्यक्ष लाभ देखील देशाला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाला केलेले आवाहन लक्षवेधी ठरते.

विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हॉट स्पॉट ठरत असल्याचे उघड झाले असून कोरोनाची साथ आल्यानंतर भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झालेली आहे. या आघाडीवरील भारताची विश्वासार्हता वाढत चालली आहे. पुढच्या काळात चीन नाही, तर भारत जगाचे औद्योगिक केेंद्र बनेल, असे दावे पाश्चिमात्य देशांचे विश्लेषक करीत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिवासी भारतीयांकडून देशाच्या विकासाला फार मोठा हातभार लागू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जातो. त्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांचे उद्गार महत्त्वाचे ठरत आहेत.

leave a reply