भांडूपमधील ड्रीम मॉलला भीषण आग

- सनराईज रुग्णालयातील ११ जणांचा बळी

मुंबई – गुरुवार मध्यरात्रीनंतर भांडूपमधील ड्रीम मॉलला भीषण आग लागली. यामध्ये या मॉलच्या इमारतीमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयातील ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या रुग्णालयामध्ये अस्थायी ‘कोविड सेंटर’ होते व कोरोनाचे ७६ रुग्ण येथे उपचार घेत होते. बळी गेलेल्या रुग्णांमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

भांडूप रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या ड्रीम मॉलमध्ये बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास आगीचा भडका उडाला. ही आग पहिल्या मजल्यावर एका दुकानातून लागल्याचे सांगण्यात येते. मात्र मॉलमधील बहुतांश दुकाने बंद असल्याने आग लागल्याचे लगेच लक्षात आले नाही. दुकानांमधील फर्निचरमुळे ही आग अतिशय वेगाने पसरत गेली. या मॉलच्या तिसर्‍या मजल्यावर सनराईज रुग्णालय असून या रुग्णालयापर्यंत धुराचे लोट पोहोचले. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी वेगाने रुग्णांना हलविण्यास सुरूवात केली. मात्र व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना वेळेत हलविता न आल्याने यातील काही रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७६ जणांपैकी ६५ जणांना जवळच्या निरनिराळ्या कोरोना सेंटर्समध्ये भरती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. रात्रभर हे बचावकार्य सुरू होते. अग्नीशामक दलाचे जवान २३ बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. १२ तास उलटल्यावरही आग नियंत्रणात आली नव्हती.

या मॉलमधील बहुतांश दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या मॉलमध्ये रुग्णालयाला परवानगी कशी दिली, असे प्रश्‍न आता उपस्थित होत आहेत. तसेच मॉलमधील अग्नीशामक यंत्रणा काम करीत नसल्याने आग विझविताना अग्नीशामक दलाच्या जवानांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. अग्नीशामक यंत्रणा काम करीत नसल्याने पालिकेकडून मॉल प्रशासनाला नोटीसही बजाविण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने या आगीत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे, तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी अंधेरीच्या मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ६ जणांचा बळी गेला होता, तर १४६ जण जखमी झाले होते. या रुग्णालयाच्या इमारतीलाही फायर एनओसी मिळाली नसल्याचे नंतर समोर आले होते. तसेच गेल्यावर्षी मुलुंडच्या ऍपेक्स रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर कोरोनाच्या ४० रुग्णांना इतरत्र हलवावे लागले होते.

याचवर्षी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा बळी गेला होता. येथेही अग्नीशामक यंत्रणेत त्रूटी होत्या व ती व्यवस्थित काम करीत नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिट करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. भांडूप मॉल व सनराईज रुग्णालयातील आगीने या दुर्घटनांची आठवण करून दिली. तसेच यामुळे रुग्णालय आणि मॉलच्या फायर ऑडिटचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

leave a reply