नाटोतील युक्रेनचा सहभाग कोणताही देश रोखू शकत नाही

- अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

रोखू शकत नाहीकिव्ह/वॉशिंग्टन – युक्रेनला नाटोत सहभागी होण्यापासून इतर कोणताही देश रोखू शकत नाही, अशी ग्वाही अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिली. यावेळी ऑस्टिन यांनी पूर्व युक्रेनमधील संघर्ष रशियानेच सुरू केल्याचा दावा करून, त्यातील शांतीप्रक्रियेत रशिया हाच मोठा अडथळा असल्याचा आरोपही केला. युक्रेनचा नाटोतील समावेश हा रशियासाठी ‘रेड लाईन’ असेल व त्याविरोधात आक्रमक प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा रशियाने सोमवारी दिला होता.

‘आपले परराष्ट्र धोरण काय असावे हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार युक्रेनला आहे. कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय युक्रेन हा अधिकार बजावू शकतो, असा आम्हाला विश्‍वास आहे’, असे सांगून युक्रेनच्या नाटोमधील समावेशाबाबत इतर कोणताही देश नकाराधिकार वापरु शकत नाही, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला. यावेळी ऑस्टिन यांनी पूर्व युक्रेनमधील संघर्षावरुनही रशियाला धारेवर धरले.

रोखू शकत नाही‘पूर्व युक्रेनमधील संघर्ष रशियानेच सुरू केला आहे. या संघर्षात शांततापूर्ण तोडगा निघण्यात रशिया हाच सर्वात मोठा अडथळा आहे. नजिकच्या काळात रशियाने पूर्व युक्रेनमधील संघर्षाला अधिक चिथावणी देणे थांबवावे तसेच क्रिमिआतूनही माघार घ्यावी. ब्लॅक सी तसेच युक्रेनच्या सीमा अस्थिर करणार्‍या कारवायाही रशियाने थांबवायला हव्यात’, असे अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी बजावले. रशियाच्या आक्रमक हालचालींपासून संरक्षण करण्यासाठी युक्रेनला जे सहकार्य हवे असेल ते सर्व पुरविण्यासाठी अमेरिका तयार आहे, अशी ग्वाहीदेखील ऑस्टिन यांनी यावेळी दिली.

गेल्या काही महिन्यात रशिया व युक्रेनमधील तणाव पुन्हा एकदा चिघळण्यास सुरुवात झाली आहे. युक्रेनकडून नाटो सदस्यत्वासाठी सुरू असलेल्या हालचाली, रशियाची इंधनवाहिनी, वाढते लष्करी सराव तसेच पूर्व युक्रेनमधील चकमकी ही यामागील कारणे असल्याचे समोर आले आहे. गेल्याच महिन्यात युक्रेनने सातत्याने नाटोचा सदस्य होण्याबाबत उघड इच्छा व्यक्त केली होती. त्यावर ही बाब रशियाच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला होता.

सोमवारी रशियाने पुन्हा एकदा याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, नाटोत युक्रेनचा समावेश ही रशियन हितसंबंधांसाठी ‘रेड लाईन’ असल्याचे बजावले. त्याचवेळी रशिया त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, याकडेही राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी लक्ष वेधले. पेस्कोव्ह हा इशारा देत असतानाच रशिया व नाटोमधील तणाव वाढल्याचेही समोर येत आहे. नाटोने रशियाच्या आठ अधिकार्‍यांना हेरगिरीच्या आरोपावरून निलंबित केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना रशियाने नाटोबरोबरील राजनैतिक संबंध पूर्णपणे तोडल्याचे जाहीर केले आहे.

leave a reply