आण्विक क्षेपणास्त्राच्या प्रदर्शनाद्वारे उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

सेऊल, दि. 9 (वृत्तसंस्था) – उत्तर कोरियाने आण्विक स्फोटके वाहून नेणाऱ्या लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची परेड करून पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केले आहे. उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीतील हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी सामर्थ्यप्रदर्शन ठरले. यात पहिल्यांदाच पाच आण्विक क्षेपणास्त्रांचा समावेश करण्यात आला, असा दावा केला जातो. याद्वारे उत्तर कोरियाने अमेरिकेला इशारा दिल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन याने दोन दिवसांपूर्वीच आपल्या लष्कराला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर किम जाँगने दिलेल्या या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाल्याचे दक्षिण कोरियन माध्यमांनी म्हटले होते. त्यानंतर पुढच्या 36 तासात उत्तर कोरियन लष्कराचे सर्वात मोठे संचलन पार पडले. दरवर्षीप्रमाणे यात क्षेपणास्त्रांचीही परेड होती. पण यंदाच्या परेडमध्ये 11 आंतरखंडीय बॅलेस्टिक आणि द्रव-इंधनावर आधारीत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आले होते.
या प्रदर्शनातून उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया, जपानसह अमेरिकेलाही इशारा दिला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या तिन्ही देशांनी उत्तर कोरियाच्या चिथावणीखोर कारवाया खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट संदेश दिले होते. त्यावर उत्तर कोरियाकडून जहाल प्र्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाने अणुस्फोटके वाहून नेणारे क्षेपणास्त्र परेडमध्ये प्रदर्शित करून हे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसत आहे. याची गंभीर दखल पाश्चिमात्य माध्यमांनी घेतलेली आहे.

leave a reply