चीनबरोबरील धोरणात्मक भागीदारी वाढविण्यास रशिया प्राधान्य देईल

- रशियन सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह

बीजिंग/मॉस्को – चीनबरोबरील धोरणात्मक भागीदारी व सहकार्य वाढविण्यास रशिया प्राधान्य देईल, अशी ग्वाही रशियाच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रुशेव्ह यांनी दिली. पत्रुशेव्ह यांच्यासह रशियाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रुशेव्ह यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे परराष्ट्र प्रमुख यांग जिएची आणि पॉलिटब्युरो व सेंल कमिटीचे सदस्य गुओ शेंगकून यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर पत्रुशेव्ह यांनी चीनबरोबरील वाढत्या सहकार्याबाबत रशियाची भूमिका स्पष्ट केली.

strategic partnership with Chinaगेल्याच आठवड्यात उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये आयोजित ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) पार्श्वभूमीवर रशिया व चीनच्या राष्ट्राध्यक्षांची स्वतंत्र बैठक पार पडली होती. या बैठकीत, रशिया व चीन हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर महाशक्तींची भूमिका निभावण्यास सक्षम असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व शी जिनपिंग यांनी केला होता. त्याचवेळी जागतिक व्यवस्थेला एकध्रुवीय बनविण्याच्या प्रयत्नांवर दोन्ही नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. गेले काही वर्षे रशिया व चीन जागतिक व्यवस्थेतील पाश्चिमात्य देशांच्या प्रभावाला आव्हान देण्याचे प्रयत्न करीत असून पुतिन-जिनपिंग भेट व त्यात दिलेला संदेश त्याला दुजोरा देणारा ठरला होता. समरकंदमध्ये झालेली चर्चा आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बोलण्यांमध्ये रशिया-चीन सहकार्य अधिक भक्कम करण्यासाठी काही प्रस्ताव समोर आले होते. या प्रस्तावांचे ठोस करारात रुपांतर करण्यासाठी दोन्ही देशांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यात इंधन, चलनविषयक व आर्थिक सहकार्य दृढ करणाऱ्या करारांचा समावेश आहे. रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रमुखांसह इतर नेत्यांचा चीन दौरा त्यासाठीच असल्याचे सांगण्यात येते.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध टाकले असले तरी चीनने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. उलट रशियाकडून इंधनाची आयात विक्रमी पातळीवर वाढविली आहे. चीनचे हे सहकार्य लक्षात घेऊन रशियाने इंधनासह चलनविषयक व्यवहारांमध्ये चीनला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत. त्यात चीनच्या युआन चलनाला प्राधान्य देण्याचा समावेश आहे. त्याचवेळी आशिया-पॅसिफिक क्षेत्रात संरक्षण सराव व गस्त यासारख्या माध्यमातून सुरक्षाविषयक सहकार्य भक्कम करण्याचीही तयारी सुरू आहे. पत्रुशेव्ह यांच्या दौऱ्यात यावर एकमत होऊ शकते, असा दावा दोन्ही देशांच्या माध्यमांकडून करण्यात आला आहे.

leave a reply