रशियन विमानांना हवाई हद्द वापरू न देण्याचा तुर्कीचा निर्णय

इस्तंबूल – तुर्कीने सिरियासाठी प्रवास करणाऱ्या रशियाच्या नागरी तसेच लष्करी विमानांना आपली हवाईहद्द बंद केली आहे. पुढील तीन महिने रशियन विमानांवरील ही बंदी कायम असेल, असे तुर्कीने स्पष्ट केले. त्यामुळे सिरियासाठी तुर्कीच्या हवाईहद्दीचा वापर करणाऱ्या रशियन विमानांना यापुढे अझरबैजानला वळसा घालून प्रवास करावा लागेल. तुर्कीच्या या निर्णयावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी शनिवारी रशियन विमानांवरील या बंदीची घोषणा केली. एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत तुर्कीने रशियाला आपली हवाईहद्द वापरू देण्याची परवानगी दिली आहे. रशिया व तुर्की यांच्यात फार आधी झालेल्या करारानुसार, एप्रिल महिन्यानंतर रशियन विमाने तुर्कीच्या हवाईहद्दीचा वापर करू शकणार नसल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

पण एका वृत्तवाहिनीने परराष्ट्रमंत्री कावुसोग्लू यांच्या हवाल्याने नवी माहिती प्रसिद्ध केली. मार्च महिन्यातच तुर्कीचे परराष्ट्रमंत्री कावुसोग्लू यांनी रशियन विमानांवर प्रवेशबंदी लागू करण्याचे रशियाबरोबरील चर्चेत स्पष्ट केले होते, असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या कारवाईचे नेमके कारण उघड केलेले नाही. पण तुर्कीच्या या निर्णयामागे युक्रेनमधील युद्धाची पार्श्वभूमी असल्याचा दावा केला जातो.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात सिरियातील सशस्त्र बंडखोर तसेच दहशतवादी सहभागी होत असल्याचा आरोप केला जातो. तुर्कीचे समर्थन असलेले सिरिया व लिबियातील दहशतवादी गट युक्रेनी लष्कराच्या बाजूने लढत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर सिरियातील अस्साद राजवट व इराणसमर्थक बंडखोर रशियाच्या बाजूने युक्रेनमधील युद्धात उतरल्याचे आरोप पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर, सिरियातील आपल्या विरोधात असलेल्या बंडखोर गटांचा युक्रेनमधील प्रवास रोखण्यासाठी तुर्कीने हा निर्णय घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात तुर्कीने तटस्थ भूमिका स्वीकारल्याचा आव आणला होता खरा. पण युक्रेनच्या लष्कराकडे तुर्कीचे ड्रोन्स असल्याचे उघड झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तुर्कीने बॉस्फोरसच्या आखाताची सीमा बंद करून रशियन युद्धनौकांची कोंडी केली होती. याच्या पाठोपाठ रशियन विमानांना तुर्कीच्या हवाई हद्दीतून प्रवास न करू देण्याचा निर्णयघेऊन तुर्कीने युक्रेनमधील युद्धात उघडपणे रशियाच्या विरोधात जाण्याची तयारी केल्याचे दिसते आहे.

leave a reply