तुर्की आफ्रिकी देशांमध्ये फ्रान्सविरोधात असंतोष भडकावित आहे

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचा आरोप

पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आफ्रिकी देशांमध्ये फ्रान्सच्या विरोधात वाढत असलेल्या असंतोषासाठी तुर्की व रशिया जबाबदार असल्याचा आरोप केला. ‘मी कट्टरवादावर कारवाईची घोषणा केली तेव्हा तुर्की व मुस्लिम ब्रदरहूड यांनी माझ्या शब्दांचा विपर्यास करून उत्तर आफ्रिकी देशांमध्ये माझ्याविरोधात असंतोष पेटविला’, असा ठपका राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी ठेवला आहे.

फ्रान्समधील प्रसिद्ध आफ्रिकी साप्ताहिक ‘यून आफ्रिक’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी तुर्की व रशियावर हल्ला चढविला. ‘तुर्की व रशिया फ्रेंच माध्यमांमध्ये फ्रान्सच्या विरोधात असंतोष व्यक्त करणाऱ्यांना पैसे चारून फ्रान्सविरोधात विषारी प्रचार करीत आहेत. फ्रेंच माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार किंवा कॅमेरामन यांना तुर्की आणि रशियाकडून पैसा पुरविला जाणे ही भयंकर बाब ठरते. याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे’, असा घणाघाती हल्ला मॅक्रॉन यांनी चढविला.

फ्रान्सच्या माध्यमांमधील तुर्की व रशियाच्या वाढत्या प्रभावावर टीका केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्समध्ये निर्माण झालेल्या अराजकासाठी तुर्की त्याचबरोबर ‘मुस्लिम ब्रदरहूड’लाही जबाबदार धरले. काही आठवड्यांपूर्वी मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील कट्टरपंथियांवर कारवाई करण्याचे जाहीर केले होते. पण तुर्की आणि मुस्लिम ब्रदरहूड यांनी उत्तर आफ्रिकी देशांमधील आपल्या प्रभावाचा वापर करून फ्रान्सविरोधात जनमत भडकाविले, अशी जळजळीत टीका मॅक्रॉन यांनी केली.

त्याचबरोबर आपला संघर्ष कट्टरपंथियांविरोधात असल्याचेही मॅक्रॉन यांनी अधोरेखित केले. उत्तर आफ्रिकी देशांमधील दहशतवाद्यांशी कुठल्याही प्रकाराची चर्चा शक्य नसल्याचे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ठासून सांगितले. निष्पाप नागरिक आणि फ्रेंच सैनिकांवर हल्ले चढविणाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू राहिल, असे मॅक्रॉन यांनी बजावले.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरुन फ्रान्स आणि तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सिरिया, लिबियातील संघर्ष तसेच भूमध्य समुद्रात तुर्कीने सुरू केलेले इंधनउत्खनन तसेच आर्मेनिया-अझरबैजान यांच्यातील संघर्षावरुन फ्रान्सने तुर्कीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. फ्रान्सला इतर युरोपिय देशांची साथ मिळू लागली आहे. जर्मनीनेही तुर्कीला यावर सज्जड इशारा दिला होता. पुढच्या काळात फ्रान्ससह इतर युरोपिय देश तुर्कीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply