चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या रशियन वैज्ञानिकाला अटक

मॉस्को – रशियाकडील गोपनीय तंत्रज्ञान चीनला दिल्याच्या संशयावरून अलेक्झांडर लुकानिन या रशियन वैज्ञानिकाला अटक करण्यात आली आहे. ६४ वर्षीय लुकानिन सैबेरियातील तोम्स्क विद्यापीठात कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या चार वर्षांत चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या रशियन वैज्ञानिकांना अटक होण्याची ही तिसरी घटना आहे. रशिया हा चीनचा जवळचा मित्रदेश असूनही चीनची हेरगिरी व रशियाकडून त्यावर होणारी कारवाईची घटना दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली दरी दाखवून देत आहेत.

हेरगिरी

काही वर्षांपूर्वी लुकानिन यांनी चीनमधील शेनयांग युनिव्हर्सिटीत शिकविण्यास सुरुवात केली होती. सुट्टीसाठी ते रशियात परत आले होते. कोरोनाच्या साथीमुळे लुकानिन रशियात अडकले होते. काही दिवसांपूर्वी रशियन गुप्तचर यंत्रणा ‘एफएसबी’ने त्यांच्या तोम्स्कमधील घरावर धाड टाकली होती. या धाडीनंतर लुकानिन यांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. लुकानिन हे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तज्ञ म्हणून ओळखण्यात येतात.

गेल्या चार वर्षात रशियन वैज्ञानिकांनी चीनसाठी हेरगिरी केल्याचे उघड होणारी ही तिसरी घटना आहे. २०१६ साली रशियन अंतराळ वैज्ञानिक व्लादिमिर लॅपिगिन यांना, चीनला हायपरसोनिक विमानाच्या तंत्रज्ञाना संदर्भातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी जून महिन्यात आर्क्टिक क्षेत्रात कार्यरत असलेले रशियाचे वरिष्ठ वैज्ञानिक व्हॅलरी मिटको यांना अटक करण्यात आली होती. रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने व्हॅलरी मिटको यांच्यावर, पाणबुडीचा शोध घेण्यासंदर्भातील तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती चीनला पुरविल्याचा आरोप ठेवला होता.

हेरगिरी

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेविरोधात रशिया-चीनची आघाडी आकारास येत असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थ, व्यापार व सामरिक क्षेत्रात दोन देशांनी परस्परांमधील भागीदारी अधिक दृढ होईल असे अनेक निर्णय घेतले होते. रशिया व चीनने अनेक जागतिक मुद्द्यांवर एकत्र येऊन परस्परांच्या भूमिकेचे जोरदार समर्थनही केले आहे. मात्र रशियाकडून चीनला पुरविण्यात येणारी अत्याधुनिक लढाऊ विमाने व संरक्षण यंत्रणांचे तंत्रज्ञान तसेच आराखडे यांची चीन नक्कल करीत असल्याचे आरोप रशियाकडून वारंवार करण्यात आले आहेत. चीनकडून रशियन तंत्रज्ञानाची होणारी चोरी आणि हेरगिरीच्या घटनांनी दोन देशांमधील तणावही समोर येऊ लागला आहे.