कोरोनाच्या जगभरातील बळींची संख्या तीन लाखांवर

बाल्टिमोर – जगभरातील दोनशेहून अधिक देशांमध्ये शिरकाव  करून हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाव्हायरसने तीन लाख जणांचा बळी घेतला आहे. या साथीचे जगभरात जवळपास ४५ लाख रुग्ण असून यापैकी १६,८२,९२४ रुग्ण बरे झाले आहेत, ही दिलासादायक बाब ठरते. जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, जगातील पहिल्या दहा देशांमध्ये सुमारे ७२ टक्के कोरोनाबाधित रुग्ण असून यामध्ये अमेरिका, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, ब्राझिल, फ्रान्स, जर्मनी, तुर्की व इराण या देशांचा समावेश आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे जगभरात ५३१४ जण दगावले असून ८८,२०२ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने म्हटले आहे. यापैकी बुधवारी अमेरिकेत १८१३ जण दगावले आहेत. तर गेल्या चोवीस तासात अमेरिकेत या साथीचे २४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिका दर दिवशी तीन ते चार लाख जणांची चाचणी घेत असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असल्याचा दावा अमेरिकी यंत्रणा करीत आहेत.

गेल्या चोवीस तासात युरोपमध्ये कोरोनामुळे जवळपास १४०० जणांचा बळी गेला असून २२ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ब्रिटनमध्ये ४२८, स्पेनमध्ये २१७, इटलीत २०६ तर फ्रान्समध्ये ८३ जण दगावले आहेत. त्याचवेळी इटली आणि स्पेनमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा केला जातो. चीन, दक्षिण कोरिया पाठोपाठ स्पेन आणि इटलीत कोरोनाची दुसरी लाट आल्याची भीती व्यक्त केली जाते.

बुधवारी ब्राझिलमध्ये ७४५ जणांचा बळी गेला असून या देशातील एकूण बळींची संख्या १३,२७६ वर गेली आहे. तर बारा हजारांच्यावर अधिक रुग्ण ब्राझिलमध्ये सापडले असून आत्तापर्यंत या साथीने ब्राझिलमध्ये १,९२,०८१ जणांना ग्रासले आहे. रशियामधील कोरोनाच्या बळींची संख्या २,३०५ वर गेली असून गुरुवारी ९,९७४ नवे रुग्ण सापडले आहेत. याबरोबर रशियातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या अडीच लाखांच्या पलिकडे गेली आहे. अवघ्या पाच दिवसात रशियात ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, चीनमध्ये गुरुवारी कोरोनाचा एक नवा रुग्ण सापडला आहे. मात्र. चीनने याबाबत केलेल्या लपवाछपवीमुळे विश्वासर्हता गमावली असून आता चीनने केलेल्या दाव्यांवर जगभरात कुणीही विश्वास ठेवायला तयार नसल्याचे दिसते. त्यातच चीनने तीन शहरे लॉकडाउन केली असून त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याचा संशय बळावत आहे.

leave a reply