देशात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली 

नवी दिल्ली – देशात चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा पहिल्यांदाच त्याहून जास्त रुग्णांनी या साथीवर मात केली आहे. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार चोवीस तासात ९५,८८० रुग्ण बरे झाले, तर ९३३३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४२ लाखांच्या पुढे गेली असून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहेत. ही दिलासादायक बाब समोर येत असताना देशात कोरोनामुळॆ गेलेल्या बळींची संख्या ८६ हजारांवर पोहोचली आहे.

कोरोनावर मात

देशात दरदिवशी ९० हजारांच्या वर नवे रुग्ण आढळत असल्याने  देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ५३ लाख ६७ हजारांपर्यंत पोहोचल्याचे आणि या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या ८६ हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होत आहे. शनिवारी महाराष्ट्रात या साथीने ४२५ जणांचा बळी गेला. तसेच २१ हजार ९०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मात्र त्याचवेळी राज्यात २३,५०१ जणांना चोवीस तासात रुग्णलयातून सुट्टीही मिळाली आहे.

आंध्र प्रदेशातही ८२१८ नवे रुग्ण आढळले, पण त्याचवेळी १०८२० रुग्ण चोवीस तासात बरे झाले. तामिळनाडूत ५५६९ नवे रुग्ण शनिवारच्या एका दिवसात सापडले असताना ५५५६ जणांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. इतर राज्यातही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ७९.२८  टक्क्यांवर पोहोचला आहे.

मात्र देशातील १० राज्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. देशात ६० टक्के रुग्णांची नोंद याच राज्यात होत असून याबाबत चिंता व्यक्त केली जाते. यातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र  मोदी २३ सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

leave a reply