समृद्ध, समर्थ आणि लोकशाहीवादी भारतच चीनला रोखेल – अमेरिकन सिनेटर व विश्लेषकाचा दावा

वॉशिंग्टन – ‘समृद्ध, सामर्थ्यशाली आणि लोकशाहीवादी भारतच वर्चस्ववादी चीनची महत्त्वाकांक्षा उधळू शकतो. त्यामुळे भारताचा विकासदर उंचावणे हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे’, असे अमेरिकन सिनेटर ‘जॉन कॉर्निन’ यांनी म्हटले आहे. तर, ‘चीनबरोबरच्या शीतयुद्धात अमेरिकेने भारताला आपला नैसर्गिक सहकारी देश म्हणून कायमस्वरूपी बरोबर ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी अमेरिकेला आपल्या धोरणात बदल करावा लागला तरी तो करावा’, असा सल्ला अमेरिकेचे विश्लेषक वॉल्टर रसेल मेड यांनी दिला.

India, China, US

कोरोनाव्हायरस, हॉंगकॉंगमधील चिनी लष्कराची कारवाई, व्यापारयुद्ध, तसेच साऊथ चायना सी, तैवान आणि झिंजियांगच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. कोरोनाव्हायरसचा शस्त्राप्रमाणे वापर करणाऱ्या चीनच्या विरोधात कठोर पावले उचलावे, अशी मागणी अमेरिकेतील सिनेटर, विश्लेषक करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात आपला प्रभाव वाढवणाऱ्या चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची फार मोठी गरज असल्याची बाब काही विश्लेषक अधोरेखित करीत आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जॉन कॉर्निन आणि वरिष्ठ विश्लेषक ‘वॉल्टर रसेल मेड’ यांनी देखील ट्रम्प प्रशासनाला हाच सल्ला दिला.

‘आधीच्या काळात शीतयुद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेने लोकशाहीवादी देशांना आर्थिक पाठबळ पुरविले होते. आतादेखील अमेरिकेला आपल्या याच जुन्या धोरणाचा अवलंब करून भारताला तसे पाठबळ पुरवावे लागेल. भारताचा विकासदर उंचाविणे हे यापुढे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे’, असा प्रस्ताव अमेरिकेतील ज्येष्ठ विश्लेषक ‘वॉल्टर रसेल मेड’ यांनी अमेरिकी वर्तमानपत्रातील आपल्या लेखात मांडला आहे. चीनबरोबरच्या शीतयुद्धात अमेरिकेला भारताचे मोठे सहकार्य लागेल, असे ब्रॅड कॉलेजचे प्राध्यापक आणि हडसन इन्स्टिट्यूट या अभ्यासगटाचे विश्लेषक असलेल्या वॉल्टर रसेल मेड यांचे म्हणणे आहे.

भारताचा विकासदर उंचावल्याचा फायदा भारताबरोबर अमेरिकेलाही होईल, ही बाब वॉल्टर यांनी अधोरेखित केली. हे साध्य करण्यासाठी अमेरिकेला भारतीय अधिकारी आणि विश्लेषकांच्या सहाय्याने काही धोरणात्मक बदल करावे लागतील. ‘चीनला शह देण्यासाठी असे धोरणात्मक बदल केले, तर भारताचा अधिक जोमाने विकास होईल आणि शांतिप्रिय, समृद्ध व सुरक्षित लोकशाहीवादी जगाची निर्मिती होईल’, असे वॉल्टर यांनी म्हटले आहे. अमेरिकन वर्तमानपत्रातील वॉल्टर यांच्या या लेखाचा दाखला देऊन सिनेटर जॉन कॉर्नेल यांनी भारताबरोबरचे सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. समृद्ध, सामर्थ्यशाली आणि लोकशाहीवादी भारतच चीनच्या वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षांना सुरुंग लावू शकतो, असे कॉर्निन यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सोव्हियत रशियाबरोबरील शीतयुद्धाच्या काळात अमेरिका भारताकडे शत्रू देश म्हणूनच पाहत होती. पण शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिकेचे भारताबरोबरील संबंध विकसित होत गेले. आत्ताच्या काळात अमेरिका भारताकडे आर्थिक व सामरिक भागीदार देश म्हणून पाहत आहे, असे असले तरी अजूनही दोन्ही देशांचे सहकार्य अपेक्षित उंची गाठू शकले नाही, अशी तक्रार दोन्ही देशांमधील विश्लेषक करीत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी भारताबरोबरील सहकाऱ्याला गती दिली व त्याचे सुपरिणाम दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत, चीनसारख्या प्रबळ देशाची आक्रमकता व बेजबाबदारपणा वाढत असताना अमेरिकन लोकप्रतिनिधी व विश्लेषक भारताबरोबरील सहकार्य दृढ व व्यापक करण्याची मागणी करीत आहेत, हे केवळ भारत व अमेरिकेसाठी नाहीतर साऱ्या जगासाठी फार मोठे सुचिन्ह ठरत आहे.

leave a reply