नागपूर, वर्ध्यात टोळधाडींने संत्रा पिकाचे नुकसान

नवी दिल्ली – ‘वाळवंट टोळधाडी’ने राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशच्या जिल्ह्यांमध्ये शिरकाव केल्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या टोळधाडीने प्रवेश केल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या १० जिल्ह्यांमध्ये तर महाराष्ट्रात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात या टोळधाडी घुसल्या आहेत. नागपुरात संत्री पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर येते.

देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या टोळधाडी मे महिन्यात भारतात घुसल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या सिमेलगच्या जिल्ह्यांना टोळ नियंत्रणासाठी उपाय सुचविले आहेत. तसेच शेतकरी सुचविण्यात आलेली कीडनाशके ट्रॅक्टर स्प्रेअर, पॉवर स्प्रेअपरद्वारे फवारू शकतात,’’ असे उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाने सुचविले आहे.

त्याचवेळी या टोळधाडी मध्यप्रदेशातून मोर्शी, वरूड व मेळघाटमार्गे महाराष्ट्रातील विदर्भात घुसल्या आहेत. त्या वेगाने पुढे सरकत आहेत. लाखोंच्या संख्येने आलेल्या टोळधाडी पिकांचा फडशा पाडत आहेत. या टोळधाडीमुळे शेतकरी तसेच संत्रा बागायतदार हादरून गेले आहेत. यामुळे विदर्भात पिकांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरिपाचा हंगाम अजून सुरु व्हायचा आहे. त्यामुळे सध्या भाज्या पिकेच शेतांमध्ये आहेत. याशिवाय संत्र्याच्या फळबाग डवरलेल्या आहेत. यामुळे काही भागात संत्रा आणि भाजी पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अलर्ट दिला आहे.

इराण आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे जन्मलेले आणि परिपक्‍व झालेल्या टोळटोळधाडी राजस्थानमधून इतर राज्यांमध्ये घुसतात. पण या टोळधाडी एप्रिलच्या आधीच पाकिस्तानात आल्या आणि त्यानंतर त्या राजस्थानमध्ये दाखल झाल्या. या टोळधाडी सध्या राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सक्रिय आहेत. यामध्ये राजस्थान सध्या सर्वाधिक बाधित राज्य असल्याची माहिती राजस्थानच्या कृषी विभागाने दिली.

या टोळधाडी एक महिन्यापासून पाकिस्तानच्या आसपासच्या भागातून राजस्थानमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पाकिस्तान हे टोळांचे नवीन प्रजनन केंद्र बनले आहे आणि म्हणूनच राज्यात टोळधाडीचे हल्ले वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी टोळधाडीचे चार झुंड जयपुरात दाखल झाले आहेत, ” असे राजस्थानच्या कृषी विभागाचे उपसचिव बीआर कडवा यांनी म्हटले आहे.

leave a reply