भारताकडून श्रीलंकेला ऑक्सिजनचा पुरवठा

कोलंबो – भारताने ऑक्सिजनचा तुटवडा भासत असलेल्या श्रीलंकेला ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. भारतीय नौदलाने ‘समुद्र-सेतु २’ या मोहीमेअंतर्गत शेजारी देशाला सहाय्य केले. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी भारताकडे हे सहाय्य मागतिले होते. त्यानुसार भारताने हे सहाय्य पुरविले आहे.

भारताकडून श्रीलंकेला ऑक्सिजनचा पुरवठाश्रीलंकेत एका दिवसात कोरोनाने १८७ जणांचा बळी घेतला असूून कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ३,७९३वर गेली आहे. श्रीलंकन सरकारने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. तसेच रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर, या देशाला ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने केलेले हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

भारतीय नौदलाचे ‘आयएनएस शक्ती’ जहाज विशाखापट्टणमहून १०० टन्स ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’घेऊन कोलंबोच्या दिशेने निघाले. त्याचवेळी श्रीलंकन नौदलाचे ‘शक्ती’ जहाज चेन्नईहून ४० टन ऑक्सिजन घेऊन कोलंबो बंदरात दाखल होत आहे. पुढच्या काळात भारत श्रीलंकेला अतिरिक्त १४० टन ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. भारतीय नौदलाने ‘समुद्र सेतु २’ या मोहिमेअंतर्गत अनेक देशांना कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला होता.

गेल्यावर्षी नौदलाने ‘ऑपरेशन समुद्र सेतु’ अंतर्गत ‘आयएनएस जलाश्व’ या युद्धनौकेतून भारत आणि श्रीलंकेत अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका केली होती. तर यावर्षीच्या जानेवारी महिन्यात भारताने श्रीलंकेला कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला होता.

दरम्यान, भारताने कोरोनाचा भयानक सामना करीत असलेल्या बांगलादेशलाही ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ने ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. तर दोन दिवसांपूर्वी भारताने बांगलादेशला ३० अँब्युलन्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे दिली. ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाला प्राधान्य देऊन भारताने हे सहाय्य केल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यावेळी म्हणाले होते.

leave a reply