दहशतवादाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता असलेला पाकिस्तान आपण दहशतवादाचे बळी असल्याचे सोंग करीत आहे

- संयुक्त राष्ट्रसंघात भारताची जळजळीत टीका

दहशतवादाचे बळीसंयुक्त राष्ट्रसंघ – ‘दहशतवादाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता असलेला पाकिस्तान आपण दहशतवादाचे बळी असल्याचा मुखवटा लावून जगाची दिशाभूल करीत आहे. भारतावर खोटेनाटे आरोप करणार्‍या पाकिस्तानने आधी आपल्या देशातील हिंदू, ख्रिश्‍चन, शीख व बौद्धधर्मियांचा संहार थांबवावा’, अशी जळजळीत टीका संयुक्त राष्ट्रसंघात भारताने केली. सीमेपलिकडून निर्यात केल्या जाणार्‍या छोट्या शस्त्रांच्या तस्करीचा वापर करून दहशतवाद्यांनी भारताचे अतोनात नुकसान केले आहे, याची आठवण संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी करून दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा व राष्ट्रसंघाच्या इतर व्यासपीठाचा वापर करून पाकिस्तान काश्मीरच्या मुद्यावर जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी जम्मू व काश्मीरमध्ये भारत मानवाधिकारांचे हनन करीत असल्याचा कांगावा केला होता. त्याला भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट यांनी सडेतोड उत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कमिटीसमोर बोलताना दहशतवादाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता व पाठिराखा देश असलेला पाकिस्तान आपण दहशतवादाचे बळी असल्याचा मुखवटा लावत असल्याचा घणाघाती आरोप केला. पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप ठोकळेबाज असून भारत हे सारे आरोप धुडकावून लावत असल्याचे डॉ. भट म्हणाल्या.

जम्मू व काश्मीर भारताचा अविभाज्य भूभाग होता आणि यापुढेही राहिल, असे डॉ. काजल भट यांनी ठणकावले. भारताला मानवाधिकारांवरून उपदेश करणार्‍या पाकिस्तानने आधी आपल्या देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, ख्रिश्‍चन, शीख आणि बौद्धधर्मियांचा संहार थांबवावा, असा मर्मभेदी टोला डॉ. भट यांनी लगावला. तर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. तिरूमुर्ती यांनी पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता, सीमेपलिकडून तस्करी करून पाठविल्या जाणार्‍या छोट्या शस्त्रांचा वापर करून दहशतवादद्यांनी भारतात घातपात घडविलेले आहेत, याकडे लक्ष वेधले. यामुळे गेल्या दोन दशकांपासून भारताचे अतोनात नुकसान झालेले आहे आणि दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात महिला आणि मुलांचाही बळी गेला आहे, असे सांगून राजदूत तिरूमुर्ती यांनी सर्वच देशांनी याच्या विरोधात ठाम भूमिका स्वीकारावी, असे आवाहन केले.

आत्ताच्या काळात छोट्या शस्त्रांच्या तस्करीसाठी ड्रोन्सचाही वापर केला जात आहे, असे सांगून याचे गांभीर्य राजदूत तिरूमुर्ती यांनी अधोरेखित केले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्‍न तसेच भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे मुद्दे आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करीत आहे. अफगाणिस्तानातील आपल्या कारवायांकडे जगाचे लक्ष जाऊ नये, यासाठी पाकिस्तानने भारतावरील आपल्या आरोपांची तीव्रता वाढविली आहे. कारण अफगाणिस्तानात तालिबानच्या कट्टरवादी व दहशतवादी कारवाया सातत्याने जगासमोर येत असून तालिबानला सर्वतोपरी सहाय्य करणारा पाकिस्तान यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकच बदनाम झाला आहे. याचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा बळी असल्याचा दावा या देशाने सुरू केला आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानात पुकारलेल्या दहशतवादविरोधी युद्धात सहभागी झाल्यामुळे पाकिस्तानातील तब्बल ८० हजार जणांचा बळी गेला, असे दावे पाकिस्तानचे नेते व अधिकारी ठोकत आहेत. या दाव्याला कसलाही आधार नाही. शिवाय ज्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानात घातपात माजविला, त्याच दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानचे सरकार वाटाघाटी करायला तयार झालेले आहे. त्यामुळे दहशतवाद हेच पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण असून तेवढे एकमेव कौशल्य या देशाने संपादन केलेले आहे, असा ठपका भारतीय विश्‍लेषकांनी ठेवला आहे.

leave a reply