पाकिस्तानने आपल्याकडील कोरोनाची साथ व अल्पसंख्याकाकडे लक्ष पुरवावे – भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचा टोला

पाकिस्तानने आपल्याकडील कोरोनाची साथ व अल्पसंख्याकाकडे लक्ष पुरवावे – भारताच्या परराष्ट्रमंत्र्याच्या टोला

नवी दिल्ली – भारतावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आधी आपल्या देशातील कोरोनाव्हायरसचा फैलाव आणि पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांची परिस्थिती याकडे अधिक लक्ष द्यावे, असा टोला भारताने लगावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हा टोला लगावत असताना आपल्या देशाच्या समस्यांकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान भारतावर दोषारोप करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात अल्पसंख्यांकांची गळचेपी होत असल्याचा कांगावा करून यासाठी भारत सरकारवर टीका केली होती. याआधीही इम्रान खान यांनी तसेच आरोप करून भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे हे आरोप कुणीही फारसे गांभीर्याने घेत नाहीत. तरीही इम्रान खान आपल्या देशाच्या मूलभूत समस्या कडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतावरील आरोपांचा वापर करीत असल्याचे याआधी अनेकवार स्पष्ट झाले होते.

भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही बाब अधोरेखित करून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आरसा दाखविला. पाकिस्तानात कोरोनाव्हायरसची साथ वेगाने फैलावत असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे श्रीवास्तव यांनी सुचविले आहे. तसेच पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांची परिस्थिती अतिशय दारुण आहे, याचीही आठवण श्रीवास्तव यांनी करून दिली.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रेशनसाठी लाईन लावणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायांच्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.पाकिस्तानच्या माध्यमांनी याबाबतची माहिती दिली होती. अल्पसंख्यांक वरील अत्याचारात जगातील सर्वात आघाडीवर असलेला देश अशी पाकिस्तानची खूप ख्याती आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगासमोर अल्पसंख्यांकांचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने त्याला सणसणीत प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला वेळोवेळी चपराक लगावली आहे.

leave a reply