दहशतवादाचा आरोप टाळण्यासाठी पाकिस्तानची धडपड

- हफीज सईदला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

लाहोर – मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याला पाकिस्तानच्या न्यायालयाने 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या हफीज सईद तुरुंगात असून याआधी त्याला दहशतवादाशी निगडीत दुसऱ्या एका प्रकरणात 11 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हफीज सईदवर पाकिस्तानात सुरू असलेले खटले व त्याचा निकाल म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप याआधी भारताने केला होता. आपण दहशतवाद्यांवर कारवाई करीत असल्याचे नाटक पाकिस्तान याद्वारे उभे करीत असल्याचे भारताचे म्हणणे आहे.

दहशतवादाचा आरोप

हफीज सईद याला लाहोर येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने दोन प्रकरणांमध्ये सुमारे 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही दोन्ही प्रकरणे दहशतवाद्यांना अर्थसहाय्य पुरविण्यासंदर्भातील असल्याचे सांगितले जाते. हफीज सईदबरोबरच त्याच्या ‘जमात-उल-दवा’ दहशतवादी संघटनेचे इतर नेते झफर इक्बाल, याह्या मुजाहिद यांनाही दहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. तर अब्दूल रेहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचे कारस्थान आखण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यापर्यंत हफीज सईदचा सहभाग होता, हे सिद्ध करणारे पुरावे भारताने पाकिस्तानकडे सोपविले होते. मात्र पाकिस्तानने हे पुरावे पुरेसे नसल्याचे सांगून सईदवरील कारवाई टाळली होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी देश अशी आपली प्रतिमा होऊ नये, यासाठी पाकिस्तानने हफीज सईदवर खटले चालविले होते. या खटल्यात त्याला शिक्षाही सुनावण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात हफीज सईद तुरुंगात नसून पाकिस्तानी लष्कराच्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत असल्याचे दावे केले जातात.

तुरुंगात असलेल्या हफीज सईद तसेच इतर दहशतवाद्यांना कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जाते. याबरोबरच त्यांना आवश्‍यक त्या साऱ्या सोयीसुविधाही पुरविल्या जातात. भारताने वेळोवेळी ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निदर्शनास आणून दिली होती. यामुळेच पाकिस्तानला सईदवर नवे खटले चालवून त्याला शिक्षा झाल्याचा देखावा पुन्हा पुन्हा उभा करावा लागत आहे. विशेषतः ‘फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान हफीज सईदवर कारवाई झाल्याचे दाखवित आहे.

leave a reply