पाकिस्तानच्या धमक्यांचा भारतावर परिणाम होणार नाही

- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग

नवी दिल्ली/इस्लामाबाद – बलोचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा होईल का, अशी चिंता काही विश्‍लेषक व्यक्त करीत असताना, पाकिस्तानच्या सरकारने ‘कश्मीर दिन’ साजरा करून भारताच्या विरोधात गरळ ओकली. जम्मू व काश्मीरमधील भारताच्या तथाकथित अत्याचारांविरोधात पाकिस्तान नेहमीच काश्मिरींच्या मागे उभा राहिल, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरच्या प्रश्‍नावर आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, असे साकडे इम्रान खान यांनी आणखी एकवार घातले आहे. तर पाकिस्तानच्या या धमक्यांचा भारतावर परिणाम होणार नाही असे भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.

जितेंद्र सिंगदरवर्षी ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान काश्मीर दिन साजरा केला जातो. पाकिस्तान काश्मिरी जनतेसोबत असल्याचे जगजाहीर करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावेळीही पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरच्या मुद्यावर भारताला धमक्या दिल्या. पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरच प्रश्‍नावर हस्तक्षेप करून भारताचे अत्याचार थांबवावे, अशी मागणी केली. पाकिस्तानचे राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, अंतर्गत सुरक्षामंत्री आणि लष्करप्रमुखांनीही भारतावर आगपाखड केली आहे.

भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी भारतावर दोषारोप करणार्‍या पाकिस्तानचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘पाकिस्तानच्या धमक्या आणि दुष्प्रचाराचा भारतावर परिणाम होणार नाही. पाकिस्तान करीत असलेल्या दुष्प्रचाराचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे. काश्मीरचा प्रश्‍न आता शिल्लक असेल तर तो पाकिस्तानच्या अवैध ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भूभागाचाच आहे’, असा टोला जितेंद्र सिंग यांनी लगावला.

जितेंद्र सिंग१९४७ सालापासून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग आहे, हे पाकिस्तानच्या पचनी पडलेले नाही. म्हणूनच याच्या विरोधात शक्य तितके सारे काही करण्याचा प्रयत्न या देशाने करू पाहिला. काश्मीरसाठी पाकिस्तानने तीन युद्धे केली. त्यानंतर भारताला हजार घावांनी रक्तबंबाळ करण्याचा कट आखून दहशतवाद्यांचे हल्ले सुरू ठेवले. पण यात पाकिस्तानला यश मिळाले नाही. आता नवी कारस्थाने अमलात आणण्यासाठी पाकिस्तानने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. पण पाकिस्तानच्या या हालचालींना उत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे समर्थ आहे’, असे जितेंद्र सिंग म्हणाले.

दरम्यान, भारताकडून काश्मीर हिरावून घेण्याच्या प्रयत्नात पकिस्तानने बांगलादेश गमावला. आता बलोचिस्तान हातचा जाण्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीतही भारताशी शत्रूत्त्व कायम ठेवले, तर पाकिस्तानला भवितव्य असूच शकत नाही, असे या देशातील बुद्धिमंत बजावत आहेत. अर्थव्यवस्था कोसळलेली असून कर्जावर पाकिस्तानचा कारभार हाकावा लागत असल्याची कबुली पंतप्रधान इम्रान खान यांनी काही आठवड्यांपूर्वी दिली होती. अशा स्थितीत भारतासारख्या देशाशी टक्कर घेऊन काश्मीर मिळवण्यासाठी प्रयत्न करणे पाकिस्तानसाठी घातक ठरेल. काश्मीर महत्त्वाचे आहे की पाकिस्तान? यावर विचार करण्याची वेळ आल्याचा इशारा काही विश्‍लेषक तसेच पत्रकारांनीही आपल्या सरकार व लष्कराला दिला होता.

leave a reply