पाकिस्तानी लष्कर आणि सिंधचे पोलीस दल आमनेसामने

कराची – पाकिस्तानातील ‘डिप स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराविरोधात सिंध प्रांताचे पोलीस तसेच वकिलांनी उठाव केला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने मुस्लिम लीगच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यासाठी सिंध प्रांताच्या पोलीस प्रमुखांचे अपहरण केल्याचे उघड झाल्यानंतर सिंध पोलिसांनी लष्कराविरोधात बंड पुकारले. सिंध प्रांताच्या ६० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी तडकाफडकी रजेचे अर्ज दाखल केले. तर सिंध प्रांतातील वकिलांच्या संघटनेने देखील पाकिस्तानी लष्कराच्या दांडगाईवर टीका करुन पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायायलयाने लष्कराला त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सिंध प्रांत गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता व्यक्त केली जाते. दरम्यान, पाकिस्तानच्या लष्कराने राजकारणातील दखलंदाजी सुरू ठेवली तर सिंधसारखी परिस्थिती पाकिस्तानातील सर्वच प्रांतात दिसेल, असा इशारा ‘पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट’चे (पीडीएम) अध्यक्ष फझलूर रेहमान यांनी दिला.

पाकिस्तानी लष्कर आणि सिंधचे पोलीस दल आमनेसामनेगेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार आणि या सरकारला सत्तेवर आणणार्‍या लष्कराविरोधात कमालीचा असंतोष वाढत चालला आहे. पाकिस्तानात लोकशाहीच्या आड लष्कराची हुकूमशाही सुरू असल्याचे आरोप केले जात असून सिंध प्रांतातील घटनेने या आरोपांची तीव्रता वाढली आहे. पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुखांवर टीका करणार्‍या मुस्लिम लीगच्या नेत्यांवरील कारवाईसाठी सिंध प्रांताचे ‘एआयजी’ मुश्ताक मेहर यांचे अपहरण केले. या कारवाई दरम्यान लष्कर आणि मेहर यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस जवानांमध्ये संघर्ष झाल्याचाही दावा केला जातो.

आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याला मिळालेल्या मानहानीकारक वागणूकीच्या विरोधात सिंध पोलिसांनी बंड पुकारले असून जवळपास सर्वच पोलीस अधिकार्‍यांनी लष्कराचा निषेध म्हणून रजेचे अर्ज दाखल केल्याचे दावे केले जात आहेत. यामध्ये तीन एआयजी, २५ डिआयजी, ३० एसएसपी आणि २० हून अधिक इतर पदाच्या पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. सिंध पोलिसांच्या या बंडानंतर लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी कराचीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लष्कराच्या विरोधातील या बंडात सिंध प्रांतातील वकिलांची संघटना देखील सहभागी झाली आहे. येथील ‘बार असोसिएशन’ने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात लष्कराच्या दादागिरीवर टीका केली आहे. त्याचबरोबर दरवेळी राजकारणातील लष्कराच्या दखलंदाजीकडे दुर्लक्ष करणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने लष्कराला त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानी लष्कर आणि सिंधचे पोलीस दल आमनेसामनेगेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानचे सरकार-लष्कराविरोधात सिंध प्रांतातील प्रशासन असा संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानचे लष्कर सिंध प्रांताचा ताबा घेण्याचा प्रयत्‍न करीत असून याआधीही येथील पोलीस दल आणि लष्करामध्ये संघर्ष पेटल्याचे व्हिडिओ समोर आले होते. पाकिस्तानी लष्कराच्या या अरेरावीविरोधात सिंधमधील जनतेने जोरदार टीका केली होती. याचे पडसाद दोन दिवसांपूर्वीच्या कराचीतील निदर्शनांवेळी उमटले होते. सिंधच्या जनतेने रस्त्यावर उतरून लष्कराच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या तसेच लष्करप्रमुखांवर अर्वाच्य भाषेत शेरेबाजी केली होती. कराचीतील घटनेने लष्कर विरोधात पोलीस असा संघर्ष तीव्र झाला असून पाकिस्तानच्या पंजाब, बलोचिस्तान, पख्तूनवाला प्रांतातही असेच पडसाद उमटण्याचा इशारा ‘पीडीएम’चे अध्यक्ष फझलूर रेहमान यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील सरकार व लष्कराविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना मिळता प्रतिसाद पाहता रेहमान यांचा इशारा अतिशय गंभीर ठरतो आहे.

सिंध प्रांतात सरकार चालविणार्‍या पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते बिलावल भूत्तो यांनी पाकिस्तानी लष्कराच्या या आगळीकीवर सडकून टीका केली आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी स्वत:हून याची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांच्या घणाघाती टीकेनंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी बिलावल यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे. यामुळे पहिल्यांदाच पाकिस्तानचे लष्कर दडपणाखाली आल्याचे दिसते आहे.

leave a reply