पाकिस्तानच्या लष्करानेच इम्रान यांना सत्तेवर आणले

- माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा आरोप

नवाझ शरीफलंडन/लाहोर – पाकिस्तानमध्ये समांतर सरकार चालविले जात असून लष्कराच्या हातात पाकिस्तानची संपूर्ण राजवट एकवटलेली आहे. याच पाकिस्तानी लष्कराने आधीच्या लोकनियुक्त सरकारला सत्तेतून बाहेर काढले आणि इम्रान खान यांचे बाहुले सरकार आणून बसविले, असा घणाघाती आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला. पाकिस्तानमध्ये सरकारच्या विरोधात राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या निदर्शनांना व्हिडिओ कॉन्फरन्सने संबोधित करताना शरीफ यांनी हा हल्ला चढविला. पाकिस्तानच्या लष्करावर केलेल्या या आरोपांना पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रत्युत्तर दिले असून नवाझ शरीफ लष्कर प्रमुख आणि आयएसप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्‍न करीत असल्याची टीका केली.

नवाझ शरीफपाकिस्तानातील ११ राजकीय पक्षांच्या ‘पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ने आयोजित केलेल्या सरकारविरोधी निदर्शनांनी पाकिस्तान दणाणून सोडले आहे. या निदर्शनांच्या निमित्ताने पाकिस्तानातील सर्व प्रांतांचे राजकीय गट एकत्र आले असून त्यांनी सरकारबरोबरच पाकिस्तानच्या लष्करालाही लक्ष्य केले. लंडनमध्ये वैद्यकीय उपचारासाठी गेलेले आणि तिथूनच या सरकारविरोधी निदर्शनांना संबोधित करणारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानच्या लष्कराला निशाण्यावर धरले. देशापेक्षा लष्कर मोठे बनले असून हेच लष्कर पाकिस्तानची राजवट चालवित असल्याचा घणाघाती आरोप शरीफ यांनी केला.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या नावाचा थेट उल्लेख करून शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये समांतर सरकार चालविले जात असल्याचा ठपका ठेवला. जनरल बाजवा यांनी इम्रान यांना सत्तेवर बसविले असून त्यांच्या आडून पाकिस्तानचे लष्करप्रमुखच हा देश चालवित असल्याची जळजळीत टीका माजी पंतप्रधान शरीफ यांनी केली. त्याचबरोबर पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद हे पडद्यामागून सूत्रे हलवित असल्याचा आरोप शरीफ यांनी केला. शरीफ यांच्या या प्रत्येक आरोपांसरशी गुजरानवाला स्टेडीयममध्ये उपस्थित हजारोंचा जमाव पाकिस्तानी लष्कराचा धिक्कार करीत होता.

नवाझ शरीफ

याबरोबर शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही निशाणा साधला. इम्रान यांचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहेत. आपल्या सरकारने आतापर्यंत केलेली सर्व कामे इम्रान यांनी नष्ट करून टाकली असून याचे परिणाम पाकिस्तानच्या जनतेला भोगावे लागत असल्याचा ठपका शरीफ यांनी ठेवला. पाकिस्तानात लोकनियुक्त नेत्यालाच गद्दार ठरविले जाते, पण पाकिस्तानी जनतेचा विश्वासघात करणार्‍या लष्करी अधिकार्‍याला मात्र गद्दार म्हटले जात नाही, अशी तक्रार शरीफ यांनी केली. दोन दिवसांपूर्वीच भ्रष्टाचाराचा आरोप झालेले लेफ्टनंट जनरल असिम बाजवा यांना गद्दार का म्हटले जात नाही, असा सवाल शरीफ यांनी केला.

शरीफ यांच्या या आरोपांमुळे पाकिस्तानातील इम्रान सरकारची कोंडी झाली असून त्यांचे नेते ही निदर्शनेच अपयशी ठरल्याचे दावे करू लागले आहेत. या निदर्शनांसाठी स्टेडियममध्ये जनता उपस्थितच नव्हती, खुर्च्या रिकाम्या होत्या, असे अजब दावे इम्रान सरकारमधील नेते करू लागले आहेत. तर पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधी पक्षांच्या या निदर्शनांना ‘सर्कस’ असे म्हटले आहे. शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि ‘आयएसआय’ प्रमुखांच्या विरोधात खालच्या स्तरावरील भाषेचा वापर केल्याची टीका इम्रान यांनी केली. तर लंडनमध्ये इम्रान यांच्या समर्थकांनी शनिवारी नवाझ शरीफ यांच्या घराबाहेर निदर्शने केल्याचे वृत्त आहे.

leave a reply