तुर्कीने केलेल्या ‘एस-४००’च्या चाचणीवर अमेरिकेचे टीकास्त्र

वॉशिंग्टन/अंकारा – तुर्कीने शुक्रवारी रशियन बनावटीच्या ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी घेतल्याची माहिती समोर आली असून अमेरिकेने त्यावर तीव्र टीकास्त्र सोडले आहे. ‘अमेरिका व नाटोचा सहकारी म्हणून तुर्कीची विशिष्ट बांधिलकी असून एस-४०० सक्रिय करणे त्याच्याशी सुसंगत ठरत नाही’, अशा शब्दात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नाराजी व्यक्त केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही तुर्कीला धारेवर धरले असून, तुर्कीने अमेरिकेचा सामरिक भागीदार म्हणून असलेल्या जबाबदारीचे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवला. रशियन क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यरत केल्यास तुर्कीला कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अमेरिकेने यापूर्वीच दिला होता. सध्या सिरिया, लिबिया, ग्रीस तसेच आर्मेनिया-अझरबैजान संघर्षावरून अमेरिका व तुर्की संबंधात जबरदस्त तणाव असून ‘एस-४००’च्या चाचणीमुळे तो चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

'एस-४००'

तुर्कीच्या ‘ब्लॅक सी’ क्षेत्रातील सिनोप भागात शुक्रवारी रशियन बनावटीच्या प्रगत ‘एस-४००’ची चाचणी घेण्यात आल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीने दिले आहे. तुर्कीच्या संरक्षण विभागाने चाचणी केल्याची कबुली देण्याचे नाकारले असले तरी सदर वृत्त फेटाळलेले नाही. यासंदर्भातील काही व्हिडीओ तसेच फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने तुर्कीने ‘एस-४००’च्या चाचणीत तीन क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची माहिती दिली आहे. लष्करी व राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात येत असल्याचे रशियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यामुळे तुर्कीने ‘एस-४००’ची चाचणी घेतल्याच्या दाव्यांना दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

तुर्कीने २०१७ साली २.५ अब्ज डॉलर्सचा करार करून रशियाकडून ‘एस-४००’ खरेदी केली होती. यावर्षी मार्च महिन्यात ही यंत्रणा पूर्णपणे सक्रिय होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या महिन्यात, ही प्रगत ‘एस-४००’ हवाईसुरक्षा यंत्रणा सदोष असल्याने ती अद्याप तैनात करण्यात आली नसल्याचा दावा ग्रीसच्या न्यूज वेबसाईटवर करण्यात आला होता. त्यावरून रशिया व तुर्कीत तणाव निर्माण झाल्याचेही ग्रीक वेबसाईटने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, तुर्कीने अचानक यंत्रणा सक्रिय करण्यासाठी पाऊल उचलून यशस्वी चाचणी घेणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

'एस-४००'

तुर्कीच्या या चाचणीवर अमेरिकेने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘एस-४०० बाबत अमेरिकेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. अमेरिका व नाटोचा सहकारी म्हणून तुर्कीची विशेष बांधिलकी आहे. एस-४०० कार्यरत होणे त्याच्याशी सुसंगत नाही. अमेरिकेने तुर्कीच्या खरेदीवर यापूर्वीच आक्षेप व्यक्त केले होते. जर तुर्की सदर यंत्रणा सक्रिय करणार असेल तर अमेरिकेसाठी ही अतिशय चिंतेची बाब ठरते’, या शब्दात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तुर्कीला फटकारले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही तुर्कीच्या चाचणीवर नाराजी दर्शविली असून, नाटो सदस्य देश व अमेरिकेचा सामरिक भागीदार म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांचे तुर्कीने उल्लंघन केले आहे, असा आरोप प्रवक्त्या मॉर्गन ओर्टागस यांनी केला. अमेरिकेचे वरिष्ठ संसद सदस्य जिम रिश यांनी, तुर्कीचे वर्तन अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. सिनेटर बॉब मॅनेडेझ यांनी, तुर्कीवर ताबडतोब निर्बंध लादावेत, अशी आक्रमक मागणी केली आहे.

leave a reply