पाकिस्तानी लष्कराचा ‘तेहरिक’शी घनघोर संघर्ष पेटणार

- अफगाणी तालिबाननेही ड्युरंड सीमेवर तोफा, रॉकेट लाँचर्स तैनात केले

taliban yaqoob durand lineइस्लामाबाद – गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानी लष्कर आणि तेहरिक-ए-तालिबान (टीटीपी) यांच्यात सुरू असलेली चर्चा फिस्कटली आहे. यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानी लष्कर लवकरच खैबर-पख्तूनख्वा, बलोचिस्तान या भागात तेहरिकच्या दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई हाती घेऊ शकेल. पाकिस्तानी लष्कराच्या यासाठी हालचाली सुरू झालेल्या असतानाच, अफगाणिस्तानात तालिबानने पाकिस्तानच्या सीमेजवळ तोफा आणि रॉकेट लाँचर्सची तैनाती केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानचे लष्कर आणि तेहरिकच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. पण गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि तेहरिकचे दहशतवादी परस्परांवर संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानातील आपल्या हस्तकांच्या सहाय्याने ‘तेहरिक’च्या चार वरिष्ठ कमांडर्सना ठार केल्याचा आरोप तेहरिकचे नेते करीत आहेत. यामध्ये ओमर खालिद खुरासानी, मुफ्ती हसन, हफिझ दौलत खान यांचा समावेश आहे. तर दोन दिवसांपूर्वी तेहरिकचा संस्थापक ‘अब्दुल वली’चा जावई अफगाणिस्तानच्या पाकतिका प्रांतातील स्फोटात मारला गेला. आपल्या चारही कमांडर्सच्या हत्येमागे पाकिस्तानी लष्कर असल्याचा आरोप तेहरिक करीत आहे.

taliban durand lineतर पाकिस्तानी लष्कर संघर्षबंदीच्या उल्लंघनासाठी तेहरिकला जबाबदार धरत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये तेहरिकने पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा आणि बलोचिस्तान प्रांतात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराने तसा आरोप केला आहे. तर पाकिस्तानी लष्कराच्या जवानापासून ते कर्नलपदापर्यंतचे अधिकारी तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये ठार झाल्याची माहिती सोशल मीडियातून समोर येत आहे. पण कुठल्याही संघर्षात आपल्या हानीची माहिती न देणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कराने यावर खुलासा केलेला नाही.

अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या लष्कराने तेहरिकच्या बड्या नेत्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. यासाठी पाकिस्तानी लष्कर खैबर-पख्तूनख्वा आणि बलोचिस्तान प्रांतात तेहरिकच्या दहशतवाद्यांवर कारवाई करणार असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी या भागातील लष्करी कमांडच्या नेतृत्वात केलेले बदल याचे संकेत देत असल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. पण या दोन्ही प्रांतात पाकिस्तानी लष्कराविरोधात स्थानिकांमध्ये असलेला असंतोष या कारवाईसमोरी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते, याकडे पाकिस्तानी पत्रकार लक्ष वेधत आहेत.

durand lineपाकिस्तानचे लष्कर सीमेजवळील तेहरिकच्या दहशतवाद्यांवर कारवाईची तयारी करीत असताना, अफगाणिस्तानात तालिबानने पाकिस्तानच्या लष्करावर कारवाईची तयारी केल्याची माहिती समोर येत आहे. अफगाणिस्तानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने ड्युरंड लाईनवर तोफा आणि रॉकेट लाँचर्स तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तानच्या पाकतिया प्रांतातील पटाण सीमेजवळ ही तैनाती करण्यात आल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या ड्युरंड लाईनवरील आगळिकीला उत्तर देण्यासाठी ही तैनाती असल्याचे अफगाणी माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला चढवून अल कायदाचा प्र्रमुख अल-जवाहिरीला ठार केले. अफगाणिस्तानातील या कारवाईसाठी पाकिस्तानच्या लष्कराने अमेरिकेला पूर्ण सहाय्य केल्याचे आरोप होत आहे. यावरून तालिबानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर, तालिबानने पाकिस्तानच्या सीमेजवळ एवढी मोठी तैनाती करून पाकिस्तानी लष्कराला इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply