फिलिपाईन्स चीनच्या ‘स्ट्रायकिंग रेंज’मध्ये

- लष्करी विश्‍लेषकाचा इशारा

मनिला – ‘साऊथ चायना सी’वर अधिकार सांगणार्‍या चीनने या सागरी क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चीनच्या ड्रोन पाणबुड्या इंडोनेशियाच्या सागरी क्षेत्रात आढळल्या होत्या. तर आता चीनचे लष्करी विमान ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील कॅगिटिंगन बेटावर उतरल्याची माहिती समोर आली आहे. सदर बेट फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात येते. चीनची ही नवी तैनाती धोकादायक असून यामुळे फिलिपाईन्स चीनच्या मार्‍याच्या टप्प्यात आल्याचा इशारा लष्करी विश्‍लेषक देत आहेत.

लष्करी विश्‍लेषक आणि अभ्यासकांसाठी सॅटेलाईट फोटोग्राफ्स पुरविणार्‍या ‘मॅक्सर टेक्नोलॉजिज्’ने काही दिवसांपूर्वी ‘साऊथ चायना सी’चे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. यापैकी फिलिपाईन्सच्या हद्दीतील ‘कॅगिटिंगन बेटा’वर (फेरी क्रॉस रिफ) चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स’चे वाय-२० लष्करी मालवाहतूक विमान उतरल्याचे स्पष्ट दिसत होते. २५ डिसेंबर रोजी ही तैनाती झाली होती. वाय-२० हे चीनच्या लष्करातील सर्वात मोठे मालवाहतूक करणारे विमान आहे. हाँगकाँगस्थित दैनिकाने कॅगिटिंगन बेटावरील या तैनातीची बातमीही प्रसिद्ध केली होती.

कॅगिटिंगन बेट फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात येते. पण ‘साऊथ चायना सी’च्या ९० टक्के क्षेत्रावर आपलाच अधिकार सांगणार्‍या चीनने या बेटावर भर टाकून येथे लष्करी तळाची उभारणी केली आहे. येथील क्षेत्रात चीनने कृत्रिम बेटांची मोठी साखळी तयार करून या बेटांवर लष्करी, हवाई तसेच नौदल तळ उभारले आहेत. तसेच रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा, विमानभेदी तोफा, ड्रोन्स तैनात केल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते.

चीनने सुरू केलेल्या या लष्करीकरणावर व्हिएतनाम, फिलिपाईन्सने टीका केली होती. फिलिपाईन्सने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात चीनच्या घुसखोरीविरोधात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही या सागरी क्षेत्रात चीन करीत असलेल्या कृत्रिम बेटांची निर्मिती बेकायदेशीर असल्याचा निर्णय जाहिीर केला होता. पण याकडे दुर्लक्ष करून चीनने या सागरी क्षेत्रातील तळांचे लष्करीकरण सुरू ठेवले होते.

आतापर्यंत चीनने कॅगिटिंगन बेटावर नौदलाचे तळ कार्यान्वित केले होते. पण सॅटेलाईट फोटोग्राफ्स आणि हाँगकाँगस्थित दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, चीनने सदर बेटावर हवाईतळ देखील कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चिंता फिलिपिनी दैनिकाने व्यक्त केली आहे. कॅगिटिंगन बेटावर लष्करी विमान रवाना करून चीन सदर हवाईतळाच्या क्षमतेची चाचणी घेतली असेल किंवा चीनने या विमानासह सदर बेटावर सैन्यतैनातीही केली असेल, अशी शक्यता जे बॅटोंग्बॅकल या फिलिपिनो लष्करी विश्‍लेषकांनी वर्तविली.

कॅगिटिंगन बेटाचे लष्करीकरण आधीपासूनच चिंतेचा विषय होता. पण चीन या बेटावर हवाईतळ कार्यान्वित करणार असेल, तर हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो, असा इशारा बॅटोंग्बॅकल यांनी दिला. ‘कॅगिटिंगन बेटावर चीनचे हवाईतळ कार्यान्वित झाली तर फिलिपाईन्सची शहरे, बंदरे, विमानतळ, लष्करी तळ चीनच्या मारक टप्प्यात येतील’, याकडे बॅटोंग्बॅकल यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेविरोधात अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि ब्रिटन हे देश व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांच्या अधिकारांचे समर्थन करीत आहेत. अमेरिकेची या क्षेत्रातील सागरी तसेच हवाई गस्त सुरू आहे. तर ऑस्ट्रेलिया व जपान यांनी या सागरी क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन केले होते. ब्रिटन आणि फ्रान्सने देखील साऊथ चायना सीच्या क्षेत्रात आपल्या युद्धनौका रवाना करण्याची घोषणा केली आहे.

leave a reply