रशियाकडून डोन्बास क्षेत्रातील बाखमत व ॲव्हडिव्हका शहरावर जबरदस्त हल्ले

Russia-massive-attackमॉस्को/किव्ह  – पूर्व युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रातील महत्त्वाची शहरे ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांनी जबर हल्ले सुरू केले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये डोनेत्स्क प्रांताचा भाग असलेल्या बाखमत व ॲव्हडिव्हका या शहरांवर घणाघाती हल्ले चढविण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी दिली. रशियन दलांकडून तोफा, रणगाडे व रॉकेट्सचा अविरत मारा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचवेळी युक्रेनच्या डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात रशियन हवाईदलाने केलेल्या कारवाईत 80हून अधिक परदेशी जवान मारले गेल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाने केला आहे. तर युक्रेनने दक्षिण भागात रशियाविरोधात सुरू केलेल्या प्रतिहल्ल्यांना रोखण्यासाठी नव्या लष्करी तुकड्या तैनात करण्यात येत असल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने सांगितले.

Russia-attackडोन्बासमधील लुहान्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविल्यानंतर रशियाने डोनेत्स्क प्रांतातील मोक्याच्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात स्लोव्हिआन्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमत या तीन शहरांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात रशियाने स्लोव्हिआन्स्क ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली होती. मात्र कालांतराने त्यात बदल करून बाखमत व ॲव्हडिव्हका या शहरांसाठी आघाडी उघडण्यात आली. त्यानुसार, गेल्या आठवड्यापासून ही शहरे ताब्यात घेण्यासाठी मोठे व आक्रमक स्वरुपाचे हल्ले सुरू झाले आहेत. येत्या आठवड्याभरात यातील किमान एक शहर रशिया ताब्यात घेईल, असे दावे करण्यात येत आहेत.

Donetsk-Battle-Mapशनिवारपासून या दोन्ही शहरांवर घणाघाती मारा सुरू असून रणगाडे, तोफा व रॉकेट्सच्या सहाय्याने हल्ले करण्यात येत आहेत. रशियन लष्करी तुकड्या दोन्ही शहरांच्या दिशेने आगेकूच करीत असून या शहरांनजिक असणारी काही गावे ताब्यात घेण्यात रशियाला यश मिळाले आहे. या शहरांवरील हल्ल्यांची तीव्रता लक्षात घेऊन युक्रेनी लष्कराने स्लोव्हिआन्स्क या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहरासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी दिली. स्लोव्हिआन्स्क व क्रॅमाटोर्स्क ही दोन्ही शहरे डोन्बासवरील संपूर्ण नियंत्रणासाठी निर्णायक मानली जातात. त्यामुळे रशिया लुहान्स्कप्रमाणेच पूर्ण सामर्थ्यानिशी आक्रमण करेल, असे संकेत विश्लेषकांकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, रशियाकडून परदेशी शस्त्रसाठा तसेच तुकड्यांना लक्ष्य करण्याची कारवाईही वेगाने सुरू आहे. शुक्रवारी रशियाच्या लढाऊ विमानांनी डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतातील व्योडोव्होमध्ये असलेल्या तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यात 80हून अधिक परदेशी जवान मारले गेले असून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा नष्ट करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षणविभागाचे प्रवक्ते इगॉर कोनाशेन्कोव्ह यांनी दिली. यासाठी हाय प्रिसिजन वेपन्सचा वापर करण्यात आल्याचे रशियन प्रवक्त्यांनी सांगितले. डिनिप्रोपेट्रोव्हस्कबरोबरच दक्षिणेतील खेर्सन प्रांतात केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे 400हून अधिक जवान मारले गेल्याचा दावाही रशियन प्रवक्त्यांनी केला.

दक्षिण युक्रेनमध्ये युक्रेनी फौजांकडून रशियाच्या ताब्यातील भागांवर प्रतिहल्ले सुरू आहेत. या प्रतिहल्ल्यांना मर्यादित यश मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र रशियन नेतृत्त्वाने ही बाब गांभीर्याने घेतली असून युक्रेनची कारवाई हाणून पाडण्यासाठी नव्या लष्करी तुकड्या तैनात करण्यात येत असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी केला.

leave a reply