ड्युरंड लाईनवर पाकिस्तानच्या विरोधात तालिबानने तोफा तैनात केल्या

काबुल – ‘इतकी वर्षे अफगाणिस्तानातील पाश्‍चिमात्य लष्करावर हल्ले चढविण्यासाठी तालिबानने पाकिस्तानात निधी गोळा केला. आता तेच आम्हाला पाकिस्तानात करायचे आहे’, असे आवाहन करुन ‘तेहरिक-ए-तालिबान’ अफगाणी जनतेकडून पाकिस्तानात हल्ले चढविण्यासाठी निधी गोळा करीत आहे. तेहरिकची ही तयारी सुरू असताना तालिबानने ड्युरंड लाईनवर पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात तोफा तैनात केल्या आहेत. तालिबानच्या राजवटीचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने ड्युरंड लाईनला भेट दिल्यानंतर तालिबानने ही तैनाती केली आहे.

अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केल्यानंतर, तालिबानचे पहिले टार्गेट दुसरे कुणी नसून पाकिस्तानच असेल, असा इशारा पाकिस्तानातील काही सजग पत्रकार आणि विश्‍लेषकांनी दिला होता. त्यांचा इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसते आहे. वारंवार इशारे देऊनही पाकिस्तानी लष्कराने ड्युरंड लाईनवर काटेरी कुंपण उभारण्याचे काम थांबविलेले नाही, असा आरोप करून तालिबानने या भागातील आपली तैनाती वाढविली आहे.

अफगाणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात ड्युरंड लाईनवर असमार आणि नारी या भागात तोफा तैनात केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील गावांवर तोफांचे हल्ले चढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याला उत्तर म्हणून तालिबानने ही तैनाती केल्याचा दावा केला जातो.

अफगाणी तालिबान ड्युरंड लाईवर तोफा तैनात करीत असताना, तेहरिक-ए-तालिबानने पाकिस्तानात मोठे हल्ले चढविण्याची तयारी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात ‘तेहरिक’ने पत्रके वाटली आहेत. यामध्ये तेहरिकने अफगाणी जनतेकडे पाकिस्तानवर हल्ले चढविण्यासाठी निधीची मागणी केली आहे.

गेली २० वर्षे अफगाणिस्तानातील पाश्‍चिमात्य लष्करावर हल्ले चढविण्यासाठी तालिबानने पाकिस्तानात निधी गोळा केला होता, याचा दाखला तेहरिकने या पत्रकात दिला आहे. अफगाणिस्तानातील तालिबान संघटना तेहरिकसाठी मोठ्या भावासारखी असून त्यांचे अनुकरण करून आपल्याला पाकिस्तानात हल्ले चढवायचे आहेत, असे तेहरिकने या पत्रकात म्हटले आहे.

तर तालिबानमधील ‘अल-बद्र’ या आत्मघाती हल्लेखोरांच्या पथकाने बुधवारी पाकिस्तानी लष्करासाठी तस्करी केला जाणारा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. गेल्या वर्षी अमेरिकेच्या लष्कराने माघार घेताना ही शस्त्रे अफगाणिस्तानातच ठेवून दिली होती. यातील काही शस्त्रसाठा अफगाणिस्तानातील पाकिस्तान समर्थक गट तसेच काळ्या बाजारात शस्त्रास्त्रांची विक्री करणार्‍या स्थानिक टोळ्यांच्या हाती लागला आहे. पाकिस्तानी लष्करासाठी अमेरिकेच्या या शस्त्रसाठ्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याच्या बातम्या अमेरिकन माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या.

पाकिस्तानचे लष्कर तेहरिकच्या दहशतवाद्यांवर कारवाईसाठी हा शस्त्रसाठा खरेदी करीत असल्याचे या अमेरिकी माध्यमांचे म्हणणे होते. तेहरिकच्या ताकदीसमोर पाकिस्तानी लष्कर थिटे पडत असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला होता. पण अमेरिकी लष्कराने मागे सोडलेला हा शस्त्रसाठा पाकिस्तानमार्गे भारतविरोधी दहशतवाद्यांच्या हाती पडत असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, तालिबान आणि पाकिस्तानातील तणाव अधिकाधिक वाढत चालल्याचा दावा केला जातो. या कारणास्तव तालिबानने पाकिस्तानात आयोजित ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’च्या बैठकीत परराष्ट्रमंत्री अमिर खान मोत्ताकी यांना पाठविले नव्हते, याची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये रंगलेली आहे. तालिबानचा हा निर्णय पाकिस्तानची नाचक्की करणारा असल्याची टीका पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत.

leave a reply