चीन आणि रशियामुळे कॅनडाच्या वीजपुरवठ्यावर सायबर हल्ल्याची शक्यता

- कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेचा इशारा

ओटावा – चीन, रशिया तसेच इराण आणि उत्तर कोरिया या देशांमधील सायबर हल्लेखोरांकडून धोका वाढत चालला असून हे सायबर हल्लेखोर कॅनडावरही सायबर हल्ले चढवू शकतो. कॅनडाला वीजपुरवठा करणाऱ्या सयंत्रावर सायबर हल्ले चढविले जाऊ शकतात, असा इशारा कॅनडाची गुप्तचर यंत्रणा ‘कम्युनिकेशन्स सिक्युरिटी एस्टाब्लिशमेंट’ने (सीएसई) दिला. तर चीनने कॅनडाचे हे आरोप फेटाळले आहेत.

वीजपुरवठा

2018 साली ‘सीएसई’ने तयार केलेल्या अहवालात सर्वात पहिल्यांदा सायबर हल्ल्याच्या धोक्याची सूचना दिली होती. पण या अहवालात कॅनेडियन गुप्तचर यंत्रणेने कुठल्याही देशाचा उल्लेख केला नव्हता. मात्र जुलै महिन्यात कॅनडासह अमेरिका आणि ब्रिटनने चीन व रशियाकडून सायबर हल्ल्याचा धोका असल्याचे म्हटले होते. या दोन्ही देशांमधील सायबर हल्लेखोर कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी आवश्‍यक माहितीची चोरी करीत असल्याचा आरोप कॅनडा व पाश्‍चिमात्य मित्रदेशांनी केला.

या सायबर हल्ल्याव्यतिरिक्त सदर सायबर हल्लेखोर आपल्या वीजपुरवठ्यावर हल्ले चढवू शकतात, असा इशारा कॅनेडियन गुप्तचर यंत्रणेने दिला. चीन तसेच रशियाने कॅनडाचे हे आरोप याआधी फेटाळले होते. चीनचे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी कॅनडाच्या आरोपांना कुठलाही आधार नसल्याचे म्हटले आहे. तसेच चीनच सायबर हल्ल्याचा पीडित असल्याचा दावा लिजियान यांनी केला.

गेल्या काही महिन्यांपासून कॅनडा आणि चीनमधील राजकीय तसेच व्यापारी संबंध बिघडले आहेत. कॅनडाने हुवेईच्या प्रमुखांना अटक केल्यामुळे चीनने कॅनडाला धमकावले होते. तसेच कॅनडाच्या विरोधात व्यापार युद्ध पुकारण्याची धमकी दिली होती. पण यानंतरही कॅनडाने तैवानसाठी युद्धनोका रवाना करून चीनला चिथावणी दिली होती.

leave a reply