इम्रान सरकार आणि लष्कराविरोधात पाकिस्तानात तीव्र आंदोलनाची तयारी

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘नया पाकिस्तान’च्या संकल्पनेच्या पूरत्या ठिकर्‍या उडाल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या दोन भाषणांनी पाकिस्तानातील राजकारण ढवळून काढले असून इम्रान खान हे निवडून आलेले नाही तर निवडलेले पंतप्रधान असल्याच्या घोषणा पाकिस्तानात तीव्र होऊ लागल्या आहेत. बलोच, सिंधी आणि पश्तू जनतेने पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात नव्या आंदोलनाची तयारी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर सरकार आणि लष्कराच्या विरोधातील या आंदोलनात पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक व सिंध प्रांतातील मोहाजिरांनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानात आंदोलनाचा मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इम्रान सरकार

दोन आठवड्यांपूर्वी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्कराविरोधात मोठी आघाडी उघडली होती. देशाच्या दुर्दशेसाठी पाकिस्तानी लष्करच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून शरीफ यांनी पाकिस्तानातील तमाम विरोधी गटांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. ‘पिपल्स डेमोक्रॅटीक मुव्हमेंट’ ही पाकिस्तानातील विरोधी पक्षांची नवी आघाडी असून मौलाना फझलूर रहमान यांच्याकडे या संघटनेची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. इम्रान सरकार आणि लष्करविरोधी गटाचे नेतृत्त्व मौलाना फझलूर यांच्याकडे सोपविल्यामुळे पाकिस्तानातील काही विश्लेषक चिंता व्यक्त करू लागले आहेत. मौलाना फझलूर यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट करणार्‍या या विरोधी पक्षांनी येत्या काही दिवसात पाकिस्तानी सरकार आणि लष्कराविरोधात देशव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे.

इम्रान सरकारया देशव्यापी निदर्शनांबरोबर पाकिस्तानात स्वतंत्र बलोचिस्तान, सिंधूदेश आणि पख्तूनिस्तानच्या घोषणा देखील तीव्र होऊ लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सरकारने सिंध प्रांतासंबंधी जाहीर केलेल्या एका निर्णयानंतर स्वतंत्र सिंधूदेशच्या घोषणेला अधिक बळ मिळाले आहे. पाकिस्तानातील ‘पाकिस्तान पिपल्स पार्टी’चे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भूत्तो यांनी सरकार व लष्कराच्या विरोधातील लढा तीव्र करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या सरकारने सिंध प्रांतातील दोन बेटांचा ताबा घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावर सिंध प्रांतात सरकार असलेल्या ‘पीपीपी’ने यावर आक्षेप घेतला असून इम्रान खान सरकार सिंध प्रांताचे लचके तोडत असल्याची टीका बिलावल भूत्तो यांनी केली आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात पाकिस्तानातील राष्ट्रवादी गट, संघटना, साहित्यिक आणि विश्लेषक एकवटले असून देशव्यापी आंदोलनाच्या हाकेला व्यापक प्रतिसाद मिळू लागला आहे.

तर बलोचिस्तान प्रांतातील ‘बलोच लिबरेशन फ्रंट’ या बंडखोर संघटनेचा प्रमुख अल्ला नझर बलोच याने सरकार आणि लष्करविरोधी आंदोलनात सर्वच गटांनी सामील व्हावे, असे आवाहन केले आहे. ‘पाकिस्तान हा देश नसून जागतिक दहशतवादाचे स्त्रोत आणि अत्याचाराचे केंद्र आहे’, अशी टीका बलोच यांनी केली. या दहशतवादाचा परिणाम आपल्या मुलाबाळांवर तसेच घरातील महिला, समाजावर होत असून हे रोखायचे असेल तर बलोच, सिंधी तसेच पश्तू यांच्याबरोबर मोहाजिर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने या निदर्शने सुरू करावी, अशी मागणी बलोच यांनी केली आहे. या व्यतिरिक्त जगभरातही बलोच, सिंधी आणि पश्तू जनतेने इम्रान सरकार आणि लष्कराविरोधात निदर्शने काढण्याची घोषणा केली आहे.

leave a reply