जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षादलांच्या जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे असून एक दहशतवादी अल बद्र या दहशतवादी संघटनेचा असल्याची माहिती मिळत आहे.

तीन दहशतवादी ठार

सुगन झैनापोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षदलांच्या हाती लागली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षादलांच्या जवानांनी या संपूर्ण परिसरा वेढा दिला. जवानांनी वेढा घातल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या चकमकीनंतर या संपूर्ण परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली.

शोपियनमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी अल बद्र या दहशतवादी संघटनेचा असल्याची माहिती मिळत आहे. ‘अल-बद्र’ या संघटनेचे अस्तित्व जम्मू-काश्मीरमधून संपले होते. मात्र काश्मीर खोऱ्यात ‘द रेजिस्टेंस फ्रन्ट’ (टीआरएफ) संघटनेला सक्रिय केल्यानंतर आता पाकिस्तानकडून ‘अल-बद्र’ला दहशतवादी संघटनेला पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे काही महिन्यापूर्वी समोर आले होते.

तीन दहशतवादी ठार

गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये पुन्हा वाढ झाली असल्याचे दिसत आहे. दोन दिवसापूर्वीच पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते. तर पंपोर बायपास येथे गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीच्या (आरओपी) पथकावर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले होते.

leave a reply