ओडिशातील चकमकीत दोन जवान शहीद

पाच माओवादी ठार

भुवनेश्वर – ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील भंडाहारी सिरकी जंगलात माओवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झााले, तर पाच माओवादी ठार झाले आहेत. यामध्ये चार महिला माओवाद्यांचा समावेश असून चकमकीच्या ठिकाणावरून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ओडिशात सुुरक्षा दलाने माओवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली असून या वर्षात ओडिसातील पाच जिल्हे माओवाद्यांपासून मुक्त केल्याचा दावा केेला जातो.

दोन जवान शहीद

मंगळवारी रात्री भंडाहारी सिरकी जंगलात माओवादी लपल्याची माहिती ओडिशा पोलिसांच्या ‘स्पेशल ऑपरेशन ग्रुप’ (एसओजी) आणि कालाहांडी ‘डिस्ट्रीक्ट व्हालेन्टरी फोर्स’ (डीवीएफ) या विशेष पथकाला मिळाली. त्यानंतर या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास सुरक्षा दलाचे पथक आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली.

सुमारे अर्धा तास ही चकमक सुरू होती. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला. तसेच चकमकीत पाच माओवादी ठार झाले. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये चार महिला माओवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच सहा शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. जखमी झालेल्या जवानाला रूग्णालयात नेत असताना वीरमरण आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

मागील काही दिवसात ओडिशामध्ये माओवादी आणि सुरक्षादलामध्ये चकमकीच्या घटना समोर येत असून कंदमाल, कालाहांडी भागात माओवादी अधिक सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. याच भागात पाच जुलै रोजी कंधमालच्या सिरला जंगलात सुरक्षा दलाने दोन महिला माओवाद्यांसह पाच जणांचे एन्काऊंटर केले होते. याच भागात २३ जुलै रोजी आणखी दोन माओवाद्यांना ठार करण्यात आले होते.

leave a reply