इराकमध्ये जनतेच्या असंतोषाचा उद्रेक

  • निदर्शकांकडून संसदेचा ताबा
  • इराणच्या हस्तक्षेपाविरोधात घोषणा

असंतोषाचा उद्रेकबगदाद – इराकच्या राजकारणातील इराणच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे इराकी जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाला. संतप्त निदर्शकांनी इराकी संसदेचा ताबा घेतला, तसेच इराकी नेत्यांच्या घरांवरही हल्ले चढविले. यावेळी निदर्शकांनी इराणच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच तुर्कीच्या दूतावासावरही हल्ले झाले. त्यामुळे इराकमध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इराकमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुक्तदा अल-सद्र या धार्मिक नेत्याचा पक्ष सर्वाधिक 73 जागांवर निवडून आला. सद्रच्या पक्षाने स्थानिक गटांना हाताशी घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा केला होता. पण इराणसमर्थक राजकीय गटांनी सद्रचा दावा फेटाळून लावल्यामुळे गेले दहा महिने इराकमध्ये राजकीय अस्थैर्य कायम आहे.

सद्र याचे समर्थन असलेल्या मुस्तफा अल-कधीमी यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती. पण इराकमध्ये इराणसमर्थक गटांचा मोठा प्रभाव असल्यामुळे कधीमी यांच्या नेतृत्वाला धक्के दिले जात आहेत. पंतप्रधान कधीमी हे अमेरिकेचे हस्तक असल्याचा आरोप इराणसमर्थक गटांनी केला होता. त्यातच या इराणमसर्थक राजकीय पक्षांनी पंतप्रधानपदासाठी मोहम्मद अल-सुदानी यांच्या नावाची घोषणा केली.

इराणनेच सुदानी यांची शिफारस केल्याचा आरोप करून सद्र यांच्या समर्थकांनी हजारोंच्या संख्येने बुधवारी इराकच्या अतिसंरक्षित ग्रीन झोन भागात घुसखोरी केली. तसेच इराकी संसदेच्या इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला सुरक्षा जवान निदर्शकांना रोखण्यात यश मिळाले. पण हजारोंच्या संख्येसमोर इराकी लष्कराचे जवान कमी पडले. निदर्शकांनी संसदेचा ताबा घेतला, तसेच त्यांनी इराणसमर्थक नेत्यांच्या घरांवरही हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

असंतोषाचा उद्रेककाही निदर्शकांनी संसदेच्या आवारातून इराणविरोधात जोरदार घोषणा दिल्या, इराणचा धिक्कार केला. तर इराकच्या उत्तरेकडील भागात तळ ठोकणाऱ्या आणि कुर्दिस्तानवर हल्ले चढविणाऱ्या तुर्कीच्या दूतावासाबाहेरही इराकी जनतेने निदर्शने केली. बुधवारी रात्री पंतप्रधान कधीमी आणि मुक्तदा अल-सद्र यांनी निदर्शकांना संसद रिकामी करण्याची सूचना केली. यानंतर ग्रीन झोन भागातील निदर्शनांची तीव्रता कमी झाल्याचा दावा केला जातो. पण बुधवारची निदर्शने इराणसाठी इशारा असल्याचे आखातातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, इराक इंधनसंपन्न अरब देश असला तरी येथे राजकीय स्थैर्य प्रस्थापित होऊ शकलेले नाही. इराणसंलग्न राजकीय पक्षांचा सत्तेवरील प्रभाव इराकी जनतेला अजिबात मान्य नाही. मुक्तदा अल-सद्र यांनी इराण व अमेरिकेचा इराकमधील राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचे बजावले होते. गेल्या वर्षी पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालात इराकी जनतेने सद्र यांना सर्वाधिक जागा जिंकून दिल्या होत्या. पण इराणशी संलग्न असलेल्या राजकीय पक्षांनी सद्र यांना सरकार स्थापन करता येणार नाही, अशी तरतूद करुन ठेवली आहे. यामुळे इराकी जनतेत इराणविरोधातील असंतोष शिगेला पोहोचला असून संसदेवरील हल्ला या असंतोषाचे गांभीर्य दाखवून देत आहे.

leave a reply