राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची रशिया नियंत्रित युक्रेनमधील मारिपोलला भेट

मॉस्को/मारिपोल – आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटनंतर अवघ्या 24 तासांमध्ये, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांतातील मारिपोल शहराला भेट दिली. मारिपोलच्या भेटीपूर्वी पुतिन यांनी क्रिमिआ प्रांताचाही दौरा केल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमिआ व मारिपोलला भेट देऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना संदेश दिल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची रशिया नियंत्रित युक्रेनमधील मारिपोलला भेटशुक्रवारी युरोपमधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (आयसीसी) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करीत असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचे अमेरिका व युरोपिय देशांसह युक्रेनने स्वागत केले होते. मात्र रशियन नेते व अधिकाऱ्यांनी त्याची खिल्ली उडविली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भूमिकेकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले होते.

मात्र आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाला मान्यता न देणाऱ्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या भेटींवरून स्पष्ट होते. शनिवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी क्रिमिआ प्रांताला भेट दिली. यावेळी त्यांनी क्रिमिआतील सुरक्षाव्यवस्था तसेच इतर कामांची माहिती घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टरने पुतिन मारिपोलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी काही स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मारिपोलमध्ये सुरू असलेली पुनर्बांधणीची कामे व इतर बाबींसंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणी केली.

युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांतातील महत्त्वाचे बंदर तसेच नौदल तळ म्हणून मारिपोल शहर ओळखण्यात येते. गेल्या वर्षी रशियाने हे शहर ताब्यात घेतले होते. रशियाने युक्रेनमध्ये छेडलेल्या लष्करी मोहिमेला मिळालेले हे सर्वात मोठे यश मानले जाते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची रशिया नियंत्रित युक्रेनमधील मारिपोलला भेटमारिपोल ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन तातडीने त्याचा दौरा करतील, असे दावे करण्यात येत होते. मात्र मारिपोलवरील ताब्याला काही महिने उलटल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्याला भेट दिल्याने रशियन वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

सध्या रशिया डोन्बासमधील बाखमत शहर ताब्यात घेण्यासाठी जोरदार संघर्ष करीत आहेत. मारिपोलप्रमाणेच बाखमतच्या बचावासाठी युक्रेनी लष्कर मोठी झुंज देत आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला युक्रेनकडून रशियावर प्रतिहल्ले चढविण्यासाठी तयारी चालू असल्याचे दावे करण्यात येत आहेत. युक्रेन डोनेत्स्क तसेच क्रिमिआ पुन्हा ताब्यात घेईल, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर क्रिमिआ प्रांत व मारिपोल शहराला रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरते. रशिया आपल्या ताब्यात तसेच नियंत्रणात असलेले भाग कोणत्याही परिस्थितीत युक्रेनच्या हवाली करणार नसल्याचा संदेश यातून दिला असल्याचे सांगण्यात येते.

रशियाकडून ‘ग्रेन डील’ला60 दिवसांची मुदतवाढ

मॉस्को – युक्रेनमधील अन्नधान्याचे साठे आफ्रिका, आखात व आशियाई देशांना पुरविणाऱ्या कराराला रशियाने 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना व तुर्कीकडून याची घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तुर्कीच्या मध्यस्थीने अन्नधान्याच्या पुरवठ्यासंदर्भातील करार करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. करारानंतर जवळपास अडीच कोटी मेकि टन अन्नधान्याची सुरक्षित निर्यात करण्यात आल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघटनेने दिली.

मात्र कराराच्या अंमलबजावणीवरून रशियाने काही आक्षेप नोंदविले होते. त्यामुळे कराराला पुन्हा मुदतवाढ मिळेल का याबाबत साशंकता निर्माण झाली होती. शनिवारी करण्यात आलेल्या घोषणेने त्याला तात्पुरता पूर्णविराम मिळाल्याचे दिसते.

 

हिंदी English

 

leave a reply