सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अस्साद युएईच्या दौऱ्यावर

दुबई – सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बाशर अल-अस्साद संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौऱ्यावर आहेत. युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांनी त्यांचे स्वागत केले. सिरियन राष्ट्राध्यक्षांचा हा युएई दौरा आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. याआधी जानेवारी महिन्यात देखील राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी युएईला भेट दिली होती. आधीच्या काळात अस्साद यांची राजवट व युएईमधील तणाव लक्षात घेता, दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित होत असलेले हे सहकार्य आखातातील बदलत्या समीकरणांचे संकेत देत आहे.

सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अस्साद युएईच्या दौऱ्यावर6 फेब्रुवारी रोजी सिरियात आलेल्या भूकंपानंतर या देशाची अवस्था बिकट बनली असून सिरिया फार मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे दावे केले जातात. त्याचवेळी या भूकंपामुळे सिरियाला आखाती देशांची सहानुभूती मिळत असल्याचेही समोर येऊ लागले आहे. सिरियातील गृहयुद्धात राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी मानवाधिकारांचे हनन केल्याचे आरोप ठेवून सौदी अरेबिया, युएई या देशांनी अस्साद राजवटीबरोबरील आपले संबंध तोडले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलली असून या वर्षाच्या जानेवारी महिन्यातच अस्साद यांच्या युएई भेटीतून त्याचे संकेत मिळू लागले होते.

चीनच्या मध्यस्थीने सौदी अरेबिया व इराणमध्ये चर्चा सुरू झाली असून इराणचा निकटतम सहकारी देश असलेल्या सिरियाचे राष्ट्राध्यक्ष युएईला भेट देत आहेत, हा योगायोग नाही. तर त्यातून आखाती क्षेत्रातील फेरबदल होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे दावे माध्यमे करीत आहेत. राष्ट्राध्यक्ष अस्साद यांनी युएईला भेट देण्याच्या आधी इराणचे माजी संरक्षणमंत्री व इराणच्या सध्याच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे सेक्रेटरी अली शामखानी यांनी देखील युएईला भेट दिली होती. त्यांची युएईचे राष्ट्राध्यक्ष अल नह्यान यांच्याशी चर्चा पार पडली होती.

इस्रायलबरोबर अब्राहम करार करून या देशाला मान्यता देणाऱ्यांमध्ये युएईचा समावेश आहे. यावरून इराणने युएईला धमकावले होते. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध विकोपाला गेले आणि त्याचे परिणाम देखील दिसू लागले होते. मात्र इराण आणि सौदी अरेबियामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर, या इराणचा सहकारी देश असलेल्या सिरिया व सौदीचा घनिष्ठ सहकारी असलेल्या युएईमध्ये चर्चा सुरू झाली असून यामुळे आखाती क्षेत्रातील देश एकत्र येण्यासाठी उत्सुकता दाखवित असल्याचे दिसू लागले आहे.

अमेरिकेचे आखाती क्षेत्राबाबतचे धोरण बदलले असून बायडेन प्रशासनाने हे क्षेत्र चीन तसेच रशियाला आपला प्रभाव वाढविण्यासाठी खुले करून दिल्याचे आरोप होत आहेत. याचा फार मोठा फटका पुढच्या काळात अमेरिकेला बसेल, असे दावे विश्लेषक करीत आहेत. त्याचवेळी इराण व आखाती देशांमध्ये सुरू झालेली चर्चा इस्रायलसाठी प्रतिकूल बाब ठरेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र इराण व सौदीमध्ये चर्चा सुरू झाली असली, तर इस्रायलबरोबरील अब्राहम करारावर याचा परिणाम होणार नाही, असे बाहरिनने नुकतेच स्पष्ट केले होते. तर येमेनमधील बंडखोरांनी देखील इराण व सौदीच्या चर्चेमुळे आपल्या सौदीविरोधी कारवाया थंडावणार नाहीत, असे जाहीर केले होते.

हिंदी

 

leave a reply